Electric Scooter : ई-बाईकच्या दुर्घटना टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती : मंत्री नितीन गडकरी | पुढारी

Electric Scooter : ई-बाईकच्या दुर्घटना टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती : मंत्री नितीन गडकरी

पुढारी ऑनलाईन : इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या अनेक घटनांचा संदर्भ देत, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक टू व्हीलरशी संबंधित अनेक अपघात समोर आले आहेत. या आग लागण्याच्या घटनांमध्ये अनेक जण जखमी झालेत तर, काहींनी आपला जीवही गमावला आहे. या घटना दुर्दैवी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अशा अपघात दुर्घटना टाळण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करण्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही या घटनांची चौकशी करत, सुधारात्मक पावले उचलण्यासाठी आणि शिफारशी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन केली आहे. चूक करणाऱ्या कंपन्यांवर आवश्यक आदेश जारी करत, लवकरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी गुणवत्ता-केंद्रित मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर एखाद्या कंपनीने आपल्या प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखवला, तर मोठा दंड ठोठावला जाईल आणि सर्व दोषपूर्ण वाहने परत बोलावण्याचे अहवालाद्वारे कंपन्यांना आदेश दिले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुढे ते म्हणाले,  प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. वस्तुस्थितीचा संदर्भ देत त्यांनी कंपन्यांना या प्रकरणात सक्रिय कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.  दरम्यान, कंपन्या सर्व दोषपूर्ण वाहने तात्काळ परत बोलावण्यासाठी आगाऊ कारवाई करू शकतात. मोदीजींच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार प्रत्येक प्रवाशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button