पुणे : प्लास्टिक कचर्‍याने वसुंधरेचा श्‍वास कोंडला! | पुढारी

पुणे : प्लास्टिक कचर्‍याने वसुंधरेचा श्‍वास कोंडला!

पुणे : आशिष देशमुख
मानवनिर्मित प्लास्टिकमुळे आपल्या पृथ्वीचेच अस्तित्व धोक्यात आले असून, दररोज महासागरांत तब्बल 12.7 दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा साचत आहे. त्यामुळे जगभरातील महासागरांत आता 40 टक्के प्लास्टिकच्या कचर्‍यामुळे सागरी जीवसृष्टीसह जमीन आणि हवेचेही प्रदूषण वाढत असल्याचा अहवाल अमेरिकेतील सेंटर फॉर बायोलॉजिकल सोसायटीने दिला आहे. मानवाने 19 व्या शतकाच्या सुरुवातीला प्लास्टिकचा शोध लावला, तेव्हा ते वरदान वाटले; पण आता त्याच कचर्‍याने संपूर्ण वसुंधरेलाच विळखा घातल्याने तिचा श्‍वास गुदमरला आहे. अमेरिकेतील सेंटर फॉर बायोलॉजिकल सोसायटीचा अहवाल डोळे उघडणारा आहे. यातील निष्कर्ष आणि आकडेवारी धक्‍कादायक आहे. प्लास्टिकमुळे दररोज किमान 1 लाख समुद्री जीवांचा मृत्यू होतो.

दररोज 12.7 दशलक्ष टन कचरा महासागरांत येतो. त्यामुळे सर्वाधिक फटका समुद्री जीवांना बसला आहे. 2050 पर्यंत 99 टक्के पक्ष्यांच्या पोटात प्लास्टिकचे तुकडे राहतील, असा अंदाज या अहवालात व्यक्‍त केला आहे. जगात प्रशांत, अटलांटिका, आर्टिक, हिंद असे चार महासागर होते. मात्र, त्यात आता दक्षिण महासागर या पाचव्या महासागराची भर पडली आहे. याला अजून जागतिक पातळीवर मान्यता मिळाली नसली, तरीही शास्त्रज्ञांच्या मते, तो पाचवा महासागर आहे. यात येणारा प्लास्टिकचा कचरा पाहिला की, पृथ्वीचा अंत जवळ आल्याची जाणीव व्हावी इतका तो भयावह आहे. पृथ्वीचा 71 टक्के भाग पाण्याने, तर 29 टक्के भाग जमिनीने व्यापला आहे. प्लास्टिक कचर्‍याने महासागराचा 40 टक्के भाग व्यापल्याने जगासाठी तो चिंतेचा विषय आहे.

आज 51 वा वसुंधरा दिन

अमेरिकेतील सागरी जीवशास्त्रज्ञ रायेल कार्सन यांनी 1962 मध्ये ‘स्प्रिंग’ नावाचे पुस्तक लिहिले. कारमुळे किती प्रमाणात प्रदूषण वाढले आहे, यावर ते होते. त्या काळात ते जगप्रसिद्ध झाले. त्यानंतर 1970 मध्ये अमेरिकेतील खासदार गेलार्ड नेल्सन यांनी प्रथम पृथ्वी दिनाची संकल्पना मांडली. ती सुरुवातीला अमेरिकेत राबवली गेली. नंतर ‘युनो’ने ही संकल्पना जागतिक पृथ्वी दिन म्हणून 22 एप्रिल 1970 पासून राबविण्यास सुरुवात केली.

जमीन अन् वायुप्रदूषणही

जलप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले, तसे वायू आणि जमिनीवरचे व भूगर्भातीलही वाढले आहे. कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान दीड अंशाने वाढल्याने जगातील सर्व राष्ट्रांनी ते कमी करण्याचा संकल्प केला आहे. वातावरणात अचानक मोठे बदल, कमी काळात खूप पाऊस, तर कुठे अवर्षण, या असमतोलाने पृथ्वीचा श्‍वास कोंडला आहे. कारण, वायुप्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता धोक्याच्या पातळीवर आहे. रोज जगाच्या हवेची गुणवत्ता पाहिली, तर अंगावर काटा येतो. भारतातील 50 शहरे जगातील 100 खराब यादीत येतात.

  • 60 टक्के जिवंत पक्ष्यांच्या पोटात प्लास्टिकचे तुकडे
  • 50 टक्के कासव, 44 टक्के पक्ष्यांचा मृत्यू प्लास्टिकमुळे
  • अमेरिकेतील सेंटर फॉर बायोलॉजिकल सोसायटीचा अहवाल

Back to top button