बेळगाव : मित्राचा खून दोन हजार रुपयांच्या व्यवहारातून | पुढारी

बेळगाव : मित्राचा खून दोन हजार रुपयांच्या व्यवहारातून

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : दोन हजार रुपयांच्या व्यवहारातून मित्रानेच मित्राचा खून केला. सोमवारी सकाळी वडगावमध्ये येळ्ळूर क्रॉसजवळ ही घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. रेडियम कटरने गळा चिरल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह अंगावर शहारे आणणारा होता. मित्रानेच मित्राचा खून केल्याने आंबेवाडीमध्ये जोरदार  चर्चा सुरू होती.

महादेव मारुती जाधव (वय 50, मूळ रा. आंबेवाडी, सध्या रा. भारतनगर सहावा क्रॉस) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी सूरज पुंडलिक केदारीचे (वय 35, रा. नाझर कॅम्प, वडगाव) याला अटक झाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, महादेव जाधव मूळचे आंबेवाडीचे असले तरी गेल्या अनेक वर्षांपासून ते भारतनगर येथील त्यांच्या मोठ्या बहिणीकडे राहतात. महादेव व सूरज हे दोघेजण गवंडीकाम करतात. पूर्वी केलेल्या कामाच्या व्यवहारात सूरज हा महादेव यांचे दोन हजार रुपये देणे लागत होता.

घरासमोर दंगा, बाहेर गेले

व्यवहाराचे दोन हजार रुपये मागण्यासाठी महादेव सोमवारी सकाळी आठच्या सुमारास नाझर कॅम्पमधील सूरजच्या घरी गेले. घरासमोर थांबून ते आरडाओरड करत होते. यावेळी सूरजने, ‘वडील आजारी आहेत, इथे दंगा नको चला, आपण बाहेर जाऊन बोलू’, असे म्हणत त्याने महादेवना बाहेर नेले. येथून हे दोघेजण एका दारूच्या दुकानात गेले व तेथे ते दारू प्यायले.

तेथून बाहेर पडून दोघे जेव्हा येळ्ळूर क्रॉस येथील रिक्षा थांब्याजवळ आले, तेव्हा महादेव यांनी सूरजकडे पुन्हा पैशाची मागणी केली. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.

गळ्याला लावले रेडियम कटर

दोघांमध्ये भांडण सुरू होताच रागाच्या भरात सूरजने त्याच्याकडे असलेले रेडियम कटर महादेव यांच्या गळ्याला लावले. महादेव यांच्या गळ्याची व सूरजच्या हातातील कटरची थोडीशी हालचाल झाल्याने धारदार कटर खोलवर घुसल्याने महादेव यांची श्वासनलिका तुटली. रक्तस्त्राव होऊन ते जागीच ठार झाले. ते पडल्याचे लक्षात येताच सूरजने येथून पळ काढला.

घटनेची माहिती शहापूर पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार व उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत महादेव यांचा मित्र व संशयित खुनी सूरज याने हा प्रकार केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा शोध सुरू केला. तो वडगावमधील एका स्मशानभूमीचा आसरा घेऊन लपून बसला होता. त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.

मृताचा भाचा संदीप मारुती कुंडेकर (रा. भारतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

सुट्टी अन् दारू बेतली जीवावर

मृत व मारेकरी हे दोघेही नियमितपणे गवंडीकामाला जात होते. मंगाईदेवीची यात्रा असल्याने त्यांनी सोमवारी व मंगळवारी सुट्टी घेतली होती. यात्रेसाठी पैसे नसल्याने महादेव हे सूरजकडे पैसे मागण्यासाठी गेले. यानंतर त्यांनी दारू प्यायल्यानंतर सूरजने त्यांचा खून केला. ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असते तर अशी घटना घडलीच नसती, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Back to top button