सातारा : ‘डोंगूर कधी गिळलं हे म्हाईत न्हाय’ | पुढारी

सातारा : ‘डोंगूर कधी गिळलं हे म्हाईत न्हाय’

सातारा : विशाल गुजर

‘इकीकडं गावचा रस्ता खचलाय दुसरीकडं गावावर असणारा डोंगूर कधी गिळलं हे म्हाईत न्हाय’, दिसभर पडणार्‍या पावसानं घरामंदी सगळा चिकुल झालायं. उजेडात काय झालंच तर काय बी करता यील पर रातीच्या अंधाराचं काय करायचं आम्ही? पावसानं आमच्या घर अन् शेतातच खेळ मांडल्यानं आता आमी जगायचं कसं तुमीचं सांगा आम्सानी? अशा समस्यांचा पाढाच सांडवलीकरांनी ‘पुढारी’जवळ वाचून दाखवला. त्यामुळे दुर्गम भागातील हे लोक रोजच्या मरणयातना कशा सहन करतात, याचा अंदाज येतो. गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. या घटनांमुळे दरड कोसळण्याचा धोका असणार्‍या गावांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. याच दरडप्रवण क्षेत्राचा आढावा ‘पुढारी’ने घेत डोंगर उरावर घेऊन जगणार्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

सातारा

डोंगराचा लगदा आमच्या घरात येतूयं…

मागच्या पावसात अनेकजणांच्या घरावर दरडी कोसळल्यात. डोंगराचा लगदा आमच्या घरात येतूयं. मग घरातच सगळा चिकुल होतूयं. दिवसा आमी याला कसबी तोंड दीयू, पण रातीच्या अंधारात काय करायचं? मागच्या आठवड्यात डोंगूर खचल्याने घरामंदी गुडघ्यापावतंर चिकुल झाला व्हता. यकीकडं घरातच चिकुल अन् दुसरीकडं पावसानं भात शेती व्हावून गेली हायं. डोंगूर खचल्याने घरंच्या घरं कोलमडल्याती. त्यामुळे आता आमी जगायचं कसं तुमीच सांगा, अशा व्यथाच ग्रामस्थांनी मांडल्या. सांडवली या गावाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणजे पळसावडे धरणानजीकचा रस्ता आहे. मात्र, हाच रस्ता आता खचल्याने सर्व दळणवळण ठप्प झाले आहे. दरडी कोसळण्याची भीती असल्याने गावांमध्ये प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.

रस्ता खचल्यानं 15 किलोमीटरची पायपीट…

सातारा तालुक्याच्या पश्‍चिम भागात असणार्‍या सांडवलीलाही पाटणसारख्या आंबेघर व मिरगावप्रमाणे धोका असल्याने तेथील ग्रामस्थांशी संवाद साधला असता अंगावर शहारे आणणारे अनुभव व व्यथा ग्रामस्थांनी मांडल्या. या परिसरात सांडवली, पळसावडे, बोंडारवाडी, मोरबाग, ताकवली मुरा, गणेशवाडी, वारसवाडी गावं हायती; पण त्यांनाही याचा फटका बसलायं. ‘जगण्यासाठी लई आटापिटा करावा लागतूयं बघा. रस्ताच नसल्याने 15-15 किलूमीटर चालत जावं लागतंय. त्यातच वरनं यकादी दरड आली की जीव गेलाचं समजा इतकी वाईट अवस्था हाय.’अशा शब्दांत गार्‍हाणे मांडले जात आहे.

पिण्यासाठी वापरलं जातं वळचणीचं पाणी…

सांडवली गावची लोकसंख्या 300 च्या आसपास असून बहुसंख्य लोक रोजगारासाठी पुणे-मुंबईत स्थायिक झाली आहे. मात्र, गावात वयस्कर आणि ज्यांना रोजगाराची काही संधी नाही. अशी लोक गावात राहतात. त्यांना ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पण, भूस्खलनामुळे गावाची पाण्याच्या पाण्याची पाईपलाईन जमीनदोस्त झाली आहे. गावाजवळ विहीर, तळी, आणि हातपंप सारखी सुविधा नसल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. गावात पाणी नसल्याने गावातले लोक पिण्यासाठी पावसाचे पाणी वापरत आहेत. घऱाच्या वळचणीचे पाणी साठवून ग्रामस्थ ते पाणी पिण्यासाठी आणि वापरासाठी त्याचा उपयोग करत आहेत.

सातारा

2 किलो रेशनसाठी तीन तासांची पायपीट…

गावात जाणारा रस्ता ढासळल्याने गावात वाहन येणं-जाणं बंद झाले आहे. गावातील लोकांना शासनाकडून सध्या तात्पुरती धान्य देण्याची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था करत असताना शासन सांडवली धरणापर्यंत रेशन पुरवते. ते दोन किलो धान्य घेऊन जाण्यासाठी सहा किलोमीटर अंतर पायी चालून येऊन घेऊन जावे लागत आहे. त्यासाठी ग्रामस्थांना तीन तासांची पायपीट करावी लागत आहे. त्यासाठी भऱ पावसात सकाळपासून ग्रामस्थांना दुपारपर्यंत रेशनच्या गाडीची वाट पाहावी लागत आहे.

यावेळच्या पावसानं आमचा कणाच मोडलाय….

घरची पडझड, भात शेती वाहून गेली. रस्ता नसल्याने दळणवळण ठप्प आहे. लोकांकडे पाच-सहा दिवस पुरेल एवढा किराणा असून. तो ही आता काही दिवसात संपत आला आहे. त्यामुळे इथून पुढे नक्की खायचं तरी काय? असा सवाल या 8 गावांतील लोकांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचं जगणं मुश्कील होऊन बसलंय. आजपर्यंत आम्ही अनेक संकटांचा सामना केला. दरड, भूस्खलन आणि त्यातून उभारी देखील घेतली; पण या पावसात आमचा कणाच मोडून पडलायं.

एवढा मोठ्ठा पूर आम्ही कधी पाहिलाच नव्हता…

मागच्या सव्वासं वरसांत जेवढा पाऊस नायं झाला तेवढा पाऊस मागच्या आठवड्यातील दोन दिसांत पडला. या पावसानं डोंगर भागात असल्याली गावांची पार वाट लागली. वढं, नदी भरून वाहत व्हंती. एवढा मोठ्ठा पूर आम्ही कधी पाहिलाच नव्हता. यात आम्ची अख्खीच्या अख्खी भात शेती वाहून गेली. यात आमच्या गावासह शेजारील गावातील लोकांचं संसार उघड्यावर आल्यात. सांडवली अन् 8 गावांना जोडणारा रस्ताच पार तुटून गेलाय. त्यामुळं आम्ही दुसरीकडं जायचं कसं?

Back to top button