शाहूवाडी : धूम स्टाइलनं महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला; चोरटा सीसीटीव्हीत कैद | पुढारी

शाहूवाडी : धूम स्टाइलनं महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला; चोरटा सीसीटीव्हीत कैद

सरुड : पुढारी वृत्तसेवा

शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे-कोकरूड रोडवरील कापशी ते वडगांव दरम्यान वृद्धेच्या गळ्यातील दीड तोळे सोन्याचा जिन्नस धूम स्टाइलने चोरून अज्ञात दुचाकीस्वाराने पोबारा केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी वडगांव गावच्या हद्दीत ही घटना घडली. शाहूवाडी पोलिस ठाण्यात सायंकाळी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. लूट झालेल्या हौसाबाई बाबाराम आस्वले (वय ६० वर्ष रा. हारुगडेवाडी, ता शाहूवाडी) या महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हारुगडेवाडी (ता. शाहूवाडी) येथील हौसाबाई बाबाराम आस्वले या पतीसोबत लुना या दुचाकीवरून सरूड रस्त्याने परखंदळे येथील नातेवाईकाच्या लग्न कार्यासाठी निघाल्या होत्या. वडगांव येथे पाठीमागून स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या तरुणाने हौसाबाई यांच्या गळ्यातील सोन्याचा दीड तोळे वजनाचा लक्ष्मी हार खेचून घेत चोरून धूम स्टाइलने पळून गेला. दरम्यान बांबवडे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सरुड येथे व्यावसायिकाच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता यामध्ये सदरचा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले आहे. फिर्यादी महिलेने चोरट्याचे सांगितलेले वर्णन मिळते-जुळते असल्याने प्राप्त सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्याला पकडण्यात लवकरच यश मिळेल, असा विश्वास शाहूवाडीचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : दोन वर्षांनी पुन्हा एकदा दख्खनचा राजा न्हाऊन निघाला गुलालात | Shree Jotiba yatra

 

Back to top button