कोल्हापूर : तेरा दिवस उडाला प्रचाराचा धुरळा | पुढारी

कोल्हापूर : तेरा दिवस उडाला प्रचाराचा धुरळा

कोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अवघा 13 दिवसांचा कालावधी मिळाला. कमी दिवस असले, तरी एकाच मतदारसंघाची निवडणूक, मर्यादित क्षेत्र, महाविकास आघाडी आणि भाजपने राज्यभरातील नेत्यांची आणलेली फौज, यामुळे तेरा दिवसांत प्रचाराचा धुरळा उडाला.

राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये टोकाचा संघर्ष सुरू असताना, कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असूनही अवघ्या चार महिन्यांपूर्वी कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर होणारी ही पोटनिवडणूक बिनविरोधच होईल, अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. मात्र, भाजपने महाविकास आघाडीसमोर शड्डू ठोकलाच. विद्यमान पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली. काँग्रेसची जागा कायम ठेवण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी, तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्याच जिल्ह्यात यानिमित्ताने भाजपचे खाते उघडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली.

जाहीर सभा, कोपरा सभा, पदयात्रा याबरोबरच ‘मिसळ पे चर्चा, ‘मॉर्निंग वॉक चर्चा’, ‘संवाद सभा’, ‘युवा मेळावा’ याद्वारे प्रचार गाजला. वाढदिवस, बारसे आदीच्या निमित्ताने ठिकठिकाणी जेवणावळी झाल्या. सोशल मीडीयाचाही खुबीने वापर करण्यात आला. स्थानिक मुद्द्यावरून राज्यातील मुद्द्यांवर तसेच प्रचारात दगडफेक झाल्यावरूनही आरोप-प्रत्यारोप गाजले. दोन्ही बाजूंनी आव्हाने-प्रतिआव्हाने दिली गेले. ‘ईडी’चा मुद्दा थेट मतदारांवरील कारवाईपर्यंत आला. पुण्यातून 3 लाख लोक आणण्याची भाषा झाली. हिंदुत्वावरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, राजेश क्षीरसागर, माजी मंत्री आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, खासदार विनायक राऊत, उदयनराजे, संजय मंडलिक, धैर्यशील माने आदींसह आमदार, पक्षांच्या महिला आघाडीच्या नेत्या आदींनी या तेरा दिवसांत कोल्हापुरातील वातावरण अक्षरश: ढवळून काढले.

Back to top button