मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, हायकमांडच्या आदेशानंतर मंत्रिमंडळ विस्तार | पुढारी

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, हायकमांडच्या आदेशानंतर मंत्रिमंडळ विस्तार

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत हायकमांडकडून लवकरच संदेश येणार असून त्याचक्षणीच यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. आरटीनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून हायकमांडच्या आदेशानुसारच मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी येडियुराप्पा यांच्या निवासस्थानी ठाण मांडले आहे. हायकमांडकडून देण्यात आलेल्या सूचनेवरून येडियुराप्पा यांच्याशी चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी मंत्रिमंडळात कोणाला संधी द्यावी व कोणाला डचू द्यावा, यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री दिल्ली दौर्‍यावरून परत आल्याची बातमी समजताच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली होती.

माजी उपमुख्यमंत्री अश्‍वत्थ नारायण, मुरगेश निराणी, व्ही. सोमण्णा, बी. सी. पाटील, आ. के. जी. बोपय्या, महेश कुमठळ्ळी, शिवणगौडा नायक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.

यादरम्यान पत्रकारांशी बोलताना सदर नेत्यांनी यावर कोणतीच चर्चा करण्यात आली नसल्याचे सांगितले. येडियुराप्या यांचे राजकीय सचिव असलेले संतोष यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.

मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ भेटीसाठी दिल्लीला जाऊन आलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रविवारी सायंकाळी पुन्हा दिल्ली दौर्‍यावर रवाना झाले आहेत. या दौर्‍यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राजकीय खलबत्ते सुरू असून मुख्यमंत्री हायकमांडच्या सूचनेच्या प्रतीक्षेत आहेत. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पांची भेट घेऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चेसाठी मुख्यमंत्री पुन्हा दिल्लीला रवाना झाले आहेत.

Back to top button