उजनी धरण : ५२ टक्के पाणीसाठा - पुढारी

उजनी धरण : ५२ टक्के पाणीसाठा

बेंबळे; पुढारी वृत्तसेवा : उजनी धरण परिसरामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे उजनीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. उजनी धरणात सध्या 52.40 टक्के (90.07 टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. भीमा खोर्‍यातील भीमाच्या उपनद्यांवरील सर्व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

त्यामुळे बंडगार्डन येथून 9 हजार 40 क्युसेक्सचा विसर्ग येत आहे. तर, दौंडचा विसर्ग 9 हजार 598 क्युसेक्सने उजनी धरणात मिसळत असून धरणामध्ये हा विसर्ग कायम राहिल्यास ऑगस्टअखेर धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.

पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण अत्यंत महत्त्वाचे आहे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही 117 टीएमसी आहे. त्यापैकी 63.65 टीएमसी मृत पाणीसाठा आहे, तर 53.57 टीएमसी पाणीसाठा उपयुक्‍त आहे.

चालूवर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यांतील कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आदी तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे शेतकर्‍यांची नजर उजनी धरणावर होती.

जुलैअखेर धरणांमध्ये वजा 22.42 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे लाभ क्षेत्रामध्ये खरिपाच्या पीक लागवडीवर मोठा परिणाम जाणवत होता. परंतु 14 जुलैपासून धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढला आहे.

17 जुलै रोजी धरण प्लसमध्ये आले तर सध्या धरणामध्ये 52 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. एकूण उपयुक्त पाणीसाठ्यापैकी निम्म्याहून अधिक उपुयक्त पाणीसाठा झाल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, उजनी धरणाच्या पाणी पातळीत झालेली समाधानकारक वाढ व पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यवृष्टीमुळे येणारा विसर्ग पाहता खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा नियंत्रित करून संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून वीजनिर्मिती, कालवा 1 व बोगद्यात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Back to top button