निपाणीजवळ वाघ आल्याची अफवा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल | पुढारी

निपाणीजवळ वाघ आल्याची अफवा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एका विडी कारखाना परिसरात वाघ आला आहे. आणि वाघाने हल्ला केल्याने दोघे जण जखमी झाले आहेत. अशा प्रकारचा व्हिडिओ शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, ही केवळ अफवा असल्याची माहिती वनअधिकारी प्रभाकर गोकाक यांनी दिली.

विशेष म्हणजे शुक्रवारी जिल्हा वन विभागाच्या पोलिस पथकाने निपाणीतून धागेदोरे मिळवले आहेत. कोल्हापुरातील एकाला सरडा प्राण्यांची हत्या होत असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतले.

हे प्रकरण ताजे असतानाच निपाणीजवळ वाघ आल्याची अफवा पसरली. यामुळे तालुक्यात घबराट पसरली.

शनिवारी सकाळी ९ पासून सदर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यामुळे १२ च्या सुमारास संबंधित व्हिडिओवर असलेल्या ठिकाणजवळ अनेकांनी गर्दी केली.

याबाबत अनेकांनी आपल्या मोबाईलवरून हा व्हिडिओ व्हायरल केल्याने निपाणी तालुक्यात एक चर्चा रंगली.

मात्र अखेर कोणत्याही प्रकारचा वन्यप्राणी निपाणी भागात आलेला नाही.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा बाहेरील असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन गोकाक यांनी केले आहे.

हे ही पाहा : 

Back to top button