चांदोली, कोयना धरणातून विसर्ग; सावधानतेचा इशारा | पुढारी

चांदोली, कोयना धरणातून विसर्ग; सावधानतेचा इशारा

सांगली; पुढारी वृत्तसेवा : धरण परिसरात पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्‍त केला आहे. परिणामी, कोयना व चांदोली धरणातून गुरुवारी पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला.

त्यामुळे दोन्ही नद्यांची पाणी पातळी वाढणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मनपा प्रशासनाने पूरग्रस्तांना सध्या तरी निवारा केंद्रातच राहण्यास सांगितले आहे.

जिल्ह्यासह सांगलीत महापूर ओसरू लागला आहे. शिवार, घरे, रस्त्यांवरील पाणी कमी होत आहे; पण पाणी अजूनही पूर्णपणे नदीपात्रात गेलेले नाही. जिल्ह्यात आज दिवसभरात पावसाची रिमझिम होती. धरण परिसरातही मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.

कोयना धरणात प्रतितास 48 हजार 938 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. परिणामी, धरणाचा पाणीसाठा वाढत आहे. सध्या धरणात 91 टीएमसी भरले

आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे धरणातून 48 हजार 931 क्युसेस विसर्ग आणखी वाढवून 51,987 पर्यंत करण्यात आला आहे.

धोम, कण्हेर आणि उरमोडी धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी पातळी पाच ते सहा फुटांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सांगलीत आज रात्रीपर्यंत पाणी 37 फुटापर्यंत खाली गेली होती. परंतु धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे शुक्रवारी सायंकाळी पातळी 42 फुटापर्यंत जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.

चांदोली धरणात 31.38 टीएमसी पाणीसाठा

चांदोली धरणात आज 31.38 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण 91.21 टक्के भरले आहे. संभाव्य पावसाच्या शक्यतेने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 9 हजार 780 क्युसेक विसर्ग सुरू होता. तो वाढवून 14 हजार 980 करण्यात आला आहे. यामुळे पाणी पातळी दोन ते चार फुटांनी वाढणार असल्याने वारणा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आज सायंकाळची पातळी व कंसात इशारा पातळी फुटामध्ये : कोयना पूल -कराड: 25.6, कृष्णा पूल – कराड : 18.9 (45), बहे पूल :7.6, ताकारी : 32.6, भिलवडी : 36.5, आयर्विन पूल -सांगली 37 (40), अंकली पूल हरिपूर 45 (45.11), म्हैसाळ बंधारा : 56 (52)

विविध धरणांतील पाणीसाठा पुढीलप्रमाणे : कंसात क्षमता टीएमसीमध्ये : कोयना : 90.47 (105.25), धोम : 10.64 (13.50), कण्हेर : 7.95 (10.10), दूधगंगा : 21.42 (25.40), राधानगरी : 8.24 (8.36), तुळशी : 3.21 (3.47), कासारी : 2.26 (2.77), पाटगाव : 3.38 (3.72), धोम बलकवडी : 3.39 (4.08), उरमोडी: 7.49 (9.97), तारळी : 5.02 (5.85), अलमट्टी : 84.46 (123).

अलमट्टी धरणातून 4 लाख विसर्ग सुरू

सांगलीच्या महापुराला कारणीभूत ठरणारे कर्नाटकातील अलमट्टी धरण सध्या 86 टीएमसी भरले आहे. या धरणात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून 4 लाख 34 हजार क्युसेक पाणी जात आहे.

या धरणातून चार लाख क्युसेक पाणी पुढे सोडले जात आहे. सध्या या जलाशयात 84.46 टीएमसी पाणी आहे. हिप्परगी जलायशातून 4 लाख 10 हजार क्युसेक विसर्ग आणि तितकीच आवक सुरू आहे.

Back to top button