‘ते’ नऊ तारे म्हणजे परग्रहवासीयांची याने? | पुढारी

‘ते’ नऊ तारे म्हणजे परग्रहवासीयांची याने?

वॉशिंग्टन : 12 एप्रिल 1950 मध्ये अमेरिकेतील एका प्रयोगशाळेने आकाशाची काही छायाचित्रे टिपली होती. त्यामधील एका छायाचित्रात नऊ विचित्र वाटणारे तारे दिसून येत होते.

मात्र, अर्ध्या तासातच हे नऊही तारे गायब झाले. आता या छायाचित्रांकडे पुन्हा एकदा संशोधकांचे लक्ष वेधले गेले आहे. ते नऊ तारे म्हणजे परग्रहवासीयांची अंतराळयाने असावीत असे काही संशोधकांना वाटते.

या छायाचित्रांचे भारतासह स्वीडन, स्पेन, युक्रेन आणि अमेरिकेतील संशोधक अध्ययन करीत आहेत. त्यांनी आपल्या सुरुवातीच्या संशोधनाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. हे तारे म्हणजे नेमके काय असावेत याबाबत त्यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत.

मात्र, त्यामध्येही हे तारे म्हणजे एलियन-शिप असावेत या मुद्द्यावर सर्वाधिक जोर देण्यात आला आहे. यापूर्वीही परग्रहवासी आणि त्यांच्या ‘यूफो’वर जगभरात चर्चा होत आली आहे.

स्वीडनच्या नॉर्डिक इन्स्टिट्यूट ऑफ थियोरेटिकल फिजिक्सचे डॉ. बियट्रिज विलारोएल आणि स्पेनच्या इन्स्टिट्यूट डी अ‍ॅस्ट्रोफिजिका डी कॅनिरियासच्या वैज्ञानिकांनी अंतराळात अन्यत्रही प्रगत जीवसृष्टी असू शकते हे प्रथमच स्वीकारले आहे.

एलियनबाबतचा सिद्धांत असलेल्या या संशोधनाची माहिती ‘नेचर’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या संशोधनात नैनितालच्या आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्व्हेशनल सायन्सेसमधील आलोक गुप्ता हे संशोधकही सहभागी आहेत.

Back to top button