औरंगाबाद : शहाजीराजे गढीचा कायापालट होणार | पुढारी

औरंगाबाद : शहाजीराजे गढीचा कायापालट होणार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे यांच्या जन्मस्थळाच्या जीर्णोद्धाराचे काम उद्यापासून (दि. 20) होणार आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून दीड कोटी निधीची तरतूद केली आहे.

छत्रपती शहाजीराजे यांचा जन्म वेरूळ येथील गढीमध्ये झाला. ही गढी म्हणजे छोटा किल्लाच आहे. साडेतीनशे वर्षांपासून ऐतिहासिक वारसा आणि इतिहासाचा साक्षीदार असलेली छत्रपती शहाजीराजे गढी दुरवस्थेत होती. 2020 मध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन गढीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी तेथील दुरवस्था पाहून गढीच्या जीर्णोद्धाराचे आश्‍वासन दिले. त्यांनी तातडीने दिवाळीपूर्वी तेथे विद्युत रोषणाईची व्यवस्था केली.
ज्या वाड्यात शहाजीराजे यांचा जन्म झाला, त्याठिकाणी धान्याचे कोठार, स्नानगृह यांचे अवशेष आजही शिल्लक असल्याचे दिसतात. परंतु हे ऐतिहासिक ठिकाण राज्य बांधकाम विभाग यांच्या ताब्यात असूनही या पवित्र स्थळाकडे दुर्लक्षित झाले होते. त्याचेही नियोजनबद्ध संवर्धन काम होणार आहे.

जन्मस्थळ ठिकाणी सध्या शहाजीराजे यांचे पुतळ्याच्या स्वरूपात भव्य स्मारक आहे. मात्र, या स्मारकास तडे गेलेले असून स्मारक ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्मारकाचाही जीर्णोद्धार केला जाणार असून परिसरात वृक्षारोपणासह विविधांगी विकास होणार आहे. गढी व स्मारक परिसराला नवसंजीवनी देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यशस्वीरीत्या प्रयत्न करत आहेत. उद्या मान्यवरांच्या हस्ते सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष

जीर्णोद्धाराच्या कामास सुरुवात होईल. सामाजिक संस्थांच्या अनेक वर्षांच्या जीर्णोद्धाराच्या मागणीला न्याय मिळणार असून गढीचा लवकरच कायापालट झालेला दिसेल.

Back to top button