हार्दिक पांड्या कडून पदार्पण करणाऱ्या चमिका करुणारत्नेला मिळाले खास गिफ्ट | पुढारी

हार्दिक पांड्या कडून पदार्पण करणाऱ्या चमिका करुणारत्नेला मिळाले खास गिफ्ट

कोलंबो : पुढारी ऑनलाईन

भारताचा हार्ड हिटर हार्दिक पांड्या सध्या बॅड पॅचमधून जात आहे. त्याला आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. असे असले तरी हार्दिक पांड्या पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने टी२० पदार्पण करणाऱ्या श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेला खास गिफ्ट दिले.

चामिका करुणारत्नेने भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चमकदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीवर श्रीलंकेचे प्रशिक्षक आर्थर जाम खूष झाले. त्यांनी या मालिकेतून आम्हाला करुणारत्ने मिळाला असे सांगितले. त्यानंतर करुणारत्नेने भारताविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात टी२० पदार्पण देखील केले.

मात्र पदार्पणात त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. पण, तरीही हा सामना त्याच्यासाठी संस्मरणीय ठरला. करुणारत्नेचा रोल मॉडेल हार्दिक पांड्या आहे. या त्याच्या रोल मॉडेलने त्याला एक संस्मरणीय गिफ्ट दिले. हार्दिक पांड्याने त्याला आपली बॅट गिफ्ट म्हणून दिली.

करुणारत्ने गेला भारावून

या गिफ्टने चामिका करुणारत्ने भारावून गेला. त्याने हा संस्मरणीय क्षण आपल्या इन्स्टाग्रामवरुन पोस्ट केला. यावेळी त्याने ‘माझ्या रोल मॉडेल हार्दिक पांड्याकडून माझ्या टी२० पदार्पणाला त्याची बॅट मिळणे हा माझा गौरव समजतो.’ अशी प्रतिक्रिया दिली.

तो पुढे लिहीतो की, ‘हार्दिक पांड्या तू जबरदस्त माणूस आहेस. तू दिलेल्या गिफ्टमुळे मी भारावून गेलो आहे. मी हा दिवस कधीही विसरणार नाही. देवाचा आशीर्वाद तुझ्यावर कायम राहो.’

हार्दिक पांड्या आला चर्चेत

करुणारत्नेची ही पोस्ट लगेचच इंटरनेट जगतात चांगलीच चर्चेत आली. हार्दिक पांड्याचे संघ सहकाऱ्यांनीही या पोस्टवर कमेंट केल्या.
हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याने ह्रदयचा इमोजी टाकला. तर हार्दिकचा मुंबई इंडियन्सचा संघ सहकारी सूर्यकुमार यादवनेही इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली.

एका चाहत्याने ‘हार्दिक पांड्या हा चांगला व्यक्ती आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या चाहत्याने ‘इंटरनेटवरील आजच्या दिवसातील ही सर्वात सुंदर गोष्ट आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : पूरग्रस्तांना बोटीतून पुरवल्या जीवनावश्यक वस्तू

Back to top button