Kolhapur Bench : कोल्हापूर खंडपीठासाठी सरकार सकारात्मक; मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देणार : मुख्यमंत्री | पुढारी

Kolhapur Bench : कोल्हापूर खंडपीठासाठी सरकार सकारात्मक; मुख्य न्यायमूर्तींना आजच पत्र देणार : मुख्यमंत्री

कोल्हापूर, पुढारी वृतसेवा : कोल्हापूर ६ जिल्ह्यांच्या अस्मितेचा प्रश्न बनलेल्या मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ (Kolhapur Bench) स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. यासंदर्भात आपण आजच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांना पत्र देत आहोत, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीत बोलताना दिली.

मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ (Kolhapur Bench) स्थापन व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांत गेल्या ३८ वर्षांपासून लढा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज दुपारी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली.

शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री सर्वश्री अनिल परब, उदय सामंत, विश्वजीत कदम, शंभूराजे देसाई, शशिकांत शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर, अरुण लाड, ऋतुराज पाटील यांच्यासह सहा जिल्ह्यांतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले, “कोल्हापुरात खंडपीठ व्हावे, यासाठी ३८ वर्षांपासून ६ जिल्ह्यांतील वकील आणि हजारो पक्षकार प्रयत्न करत आहेत. त्यांचा अव्याहतपणे लढा सुरू आहे. सहा जिल्ह्यांतून किमान साडेतीन लाख खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. खंडपीठ झाल्यास पक्षकारांच्या वेळ आणि पैसा वाचेल हा प्रश्न आत्ता पक्षकारांच्या जिव्हाळ्याचा बनला असल्याने आपण स्वतः मुख्यमंत्री या नात्याने पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.”

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, “मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी प्रदीर्घ लढा सुरू आहे. खंडपीठासाठी सर्वसामान्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे ठोस निर्णय घेणे महत्त्वाचे वकील पक्षकार यांच्यासह सामान्य जनताही खंडपीठाच्या आंदोलनात अग्रभागी असल्याने खंडपीठ स्थापनेशिवाय पर्याय नाही”, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

शिष्टमंडळाशी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “कोल्हापूर सांगलीसह सहा जिल्ह्यांतील पक्षकार वकील आणि लोकभावना लक्षात घेऊन खंडपीठ स्थापनेबाबत सरकार सकारात्मक आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने यासंदर्भात आज आपण मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र देत आहोत. शिवाय सरकारच्या वतीने निश्चित पाठपुरावा करण्यात येईल”, अशी त्यांनी ग्वाही दिली. दरम्यान कोल्हापूर खंडपीठ स्थापनेच्या अनुषंगाने कोल्हापूर खंडपीठ कृती समिती आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी उद्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.

Back to top button