टोकियो ऑलिम्पिक : खेळ मांडियेला... | पुढारी

टोकियो ऑलिम्पिक : खेळ मांडियेला...

मानवाची शारीरिक कौशल्याची परिसिमा किती उंची गाठते, याचे औत्सुक्य ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पुरे होते आणि जागतिक पटावर दर चार वर्षांनी मांडला जाणारा खेळ यंदा टोकियोमध्ये रंगण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. ऑलिम्पिकमधल्या भारताच्या सहभागाला यावर्षी योगायोगाने 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1920 मध्ये बेल्जियममध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे पथक पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील क्रीडाविश्वासाठी ऑलिम्पिक ही खेळाडूंसह इतरांमध्ये ही उत्साह वाढवणारी एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये पहिल्यांदा भारताला कुस्तीमधले वैयक्तिक पदक मिळवून दिले. त्यानंतर तब्बल 44 वर्षे वाट पाहिल्यावर भारताला 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये लिएंडर पेसच्या टेनिसमधल्या जिगरबाज कामगिरीमुळे वैयक्तिक पदक मिळवता आले.

त्यानंतर कर्णम मल्लेश्वरी, राजवर्धन राठोड, अभिनव बिंद्रा, वीजेंदर सिंग, सुशील कुमार, गगन नारंग, सायना नेहवाल, मेरी कोम यांनी देशाला वैयक्तिक पदके मिळवून देण्याची मालिका सुरू केली. मात्र, 2012 मध्ये सर्वाधिक सहा पदके मिळवल्यानंतर 2016 मधल्या रियो ऑलिम्पिकमध्ये मात्र भारताला केवळ दोनच पदकांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता क्रीडाप्रेमींमध्ये आहे.

खरे तर कोरोनाची झळ पोहोचण्यापूर्वी अनेक खेळाडूंची तयारी अतिशय जोरात सुरू होती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नसता, तर कदाचित यापेक्षा जास्त खेळाडूदेखील ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असते. गेल्या वेळच्या रियो ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये पदकांपासून थोडक्यात वंचित राहिलेल्या. मात्र, आपल्या आश्चर्यकारक कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेणार्‍या दीपा करमाकरला दुखापतीचा आणि कोरोनामुळे रद्द झालेल्या स्पर्धांचा फटका बसला नसता, तर कदाचित तीदेखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिसली असती.

मात्र, भारतीय पथकामध्ये यावेळीही असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांच्यात भारताला पदक मिळवून देण्याची क्षमता आहे. वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकत भारताचे खाते उघडले आहे. त्यापाठोपाठ पी. व्ही. सिंधू, मेरी कोम दुहेरी पदकाचा इतिहास लिहिणार का? कुस्तीपटू बजरंग पुनिया, तिरंदाज दीपिकाकुमारी, नेमबाजीत राही सरनोबत, तेजस्विनी सावंत जागतिक पदकाच्या लौकिकाचा खेळ करणार का? सध्याच्या परिस्थितीत भारतीय हॉकी पुरुष संघाने सुरुवात चांगली केली असली तरी त्यांच्यापुढे स्पेनसारख्या संघाचे कडवे आव्हान आहे. रोईंगमध्येही उपांत्य फेरी गाठली आहे. सानिया मिर्झा आणि अंकिता रैना यांच्याकडून निराशा झाली. तलवारबाजीत भवानीदेवीचे स्वप्न अधुरे राहिलेे. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताने एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह केवळ 2 पदके मिळविली होती.

यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये 127 जणांचा जम्बो संघ स्पर्धेत सहभागी झाला असून, 10 टक्के पदकांची संख्या गृहित धरली तर भारताला 10 ते 12 पदके मिळणे अपेक्षित आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंतचा नेमबाजीतील सर्वात मोठा चमू उतरवला आहे. 15 नेमबाजांचा सहभाग असून रायफल, पिस्तूल आणि शॉटगन प्रकारांमध्ये भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. 15 पैकी 4 जणांचे तर हे पहिलेच ऑलिम्पिक आहे. दिव्येश सिंगकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. राही सरनोबत (25 मीटर पिस्तूल), अपूर्वी चंडेला (10 मीटर एअर रायफल), संजीव राजपूत (50 मीटर रायफल, थ्री पोझिशन) आणि मईराज यांनी याआधी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. खरे तर दिव्येश सिंग, अभिषेक वर्मा, यशस्विनी देस्वाल, चिंकी यादव, सौरभ चौधरी, मनू भाकर यांच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

बॉक्सिंगमध्ये मेरी कोम या अनुभवी महिला स्पर्धकाप्रमाणेच लेविना बोरगोहेन या आसामच्या महिला खेळाडू बरोबरच पुरुषांमध्ये हरियाणाचा अमित पोंगल, विकास किशन यांच्याकडून पदकांची अपेक्षा केली जात आहे. कुस्तीमध्ये बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रविकुमार यांच्यापैकी कुणीतरी पदक मिळवेल, अशी आशा आहे. महिलांमध्ये विनेश फोगाट पदकाची दावेदार मानली जात आहे. पी. व्ही. सिंधू रिओच्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल, अशी आशा आहे. भारतीय संघातील खेळाडूंना प्रामुख्याने अमेरिका, चीन, जपान, इंडोनेशिया आदी खेळाडूंचे मुख्य आव्हान राहणार आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये चीनची झीयु हौ, इंडोनेशियाची विंडी कँटिका आइशाह यांचे आव्हान आहे. तलवारबाजीत ट्युनिशियाची नादिया बेन अजीजीला, फ्रान्सची एम ब्रुनेट आदींची टक्कर राहणार आहे. बॉक्सिंगमध्ये डॉमिनिक रिपब्लिकची गार्सिया, कोलंबियाची इनग्रीट वलेन्सियाचे आव्हान, टेबल टेनिसमध्ये युक्रेनची मारग्रेट पेसोत्सकाचा पराभव करीत भारताची मनिका बत्राने विजय मिळविला. महिला टेनिसमध्ये युक्रेनच्या जुळ्या बहिणी ल्युडमीला व्हिक्टोरिवना किचेनोक आणि नाडिया व्हिक्टोरिवना किचेनोक यांनी भारताची अनुभवी सानिया मिर्झा आणि युवा अंकिता रैना या जोडीचा पराभव केला. एकंदरित टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताची सद्यपरिस्थिती पाहता आतापर्यंत केवळ एक रौप्य पदक भारताला मिळाले असले तरी प्रामुख्याने नेमबाजीसह इतर खेळ प्रकारांमध्ये भारताला पदकांची अपेक्षा अधिक आहे.

खेळाडूंची होत असलेली कामगिरी ही वाखणण्याजोगीच आहे. त्यामुळे भारत यावर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या दोन अंकी आकड्यापर्यंत नक्कीच पोहोचेल, अशी आशा आहे. अर्थात, पदके मिळणे हे त्या त्या वेळी कौशल्य कसे प्रकट होते, त्यावर अवलंबून असले तरी लढाऊ, झुंजार वृत्ती किती प्रमाणात दिसते, हे महत्त्वाचे असते आणि क्रीडारसिकांची अपेक्षाही एवढीच आहे.

Back to top button