शिरोळ तालुक्याला दिलासा, उदगांवला कृष्णेचे पाणी १ फुटाने उतरले | पुढारी

शिरोळ तालुक्याला दिलासा, उदगांवला कृष्णेचे पाणी १ फुटाने उतरले

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच दिवसांपासून शिरोळ तालुक्यात महापुराने थैमान घातले आहे. तर रविवारी दिवसभर कराड, ताकारी परिसरात पाणी कमी झाल्याचे वृत्त होते. मात्र, शिरोळ तालुक्यात पाणी वाढत होते.

अखेर सोमवारी सकाळ पासून कृष्णा नदीची पाणी पातळी उदगांव (ता.शिरोळ) येथे १ फूट कमी झाली. पाणी उतरत असल्याने शिरोळ तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, दुधगंगा व वारणा नदीच्या पाण्यामुळे ४३ गावांत महापूर आला आहे. त्यामुळे ५२ हजार नागरिकांना स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर २२ हजार जनावरे स्थलांतर करण्यात आली आहेत.

तर रविवारी नद्यांचे पाणी उतरेल असे वाटत होते. तर कृष्णा नदीचे पाणी कराड व बहे बोरगाव येथे उतरल्याचे वृत्त होते. पण तालुक्यात पाणी वाढत असल्याने मोठी चिंता वाढली होती. अखेर सोमवारी सकाळपासून पाणी उतरण्यास सुरुवात झाली.

दरम्यान, पुणे- बंगळूर महामार्ग अखेर चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी दहा वाजता वाहतुकीस खुला झाला आहे. पुणे- बंगळूर महामार्ग खुला झाल्याने अडकून पडलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली. महापुराने पुणे बंगळूर महामार्ग व्यापून टाकला होता. शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर काही ठिकाणी सहा फूट तर काही ठिकाणी दहा फुटांवर पाण्याची पातळी होती.

त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहानंतर बंद करण्यात आला होता. तीन दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज सकाळी झपाट्याने पाणी ओसरले.

कोल्हापूर जिल्ह्यातील ३६६ गावे अजूनही पूरबाधित आहेत. सात नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंचगंगा नदीने विक्रमी ५६ फूट तीन इंच पाणी पातळी गाठली होती. त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहर जलमय बनले होते. आता हळूहळू पूर ओसरत आहे. त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुर्ववत होत आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

Back to top button