वॉशिंग्टन : मोठ्या ग्रहीय स्थितीचे उलगडणार गूढ | पुढारी

वॉशिंग्टन : मोठ्या ग्रहीय स्थितीचे उलगडणार गूढ

वॉशिंग्टन : आपल्या ब्रह्मांडामध्ये असे अनेक अवकाशीय पिंड आहेत की, त्यांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत तर पोहोचतो, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसते. तसेच यापूर्वी चांगल्या आणि अद्ययावत स्पेस टेलिस्कोपअभावी अशा अवकाशीय पिंडांची माहितीही मिळू शकत नव्हती.

गेल्या दशकभरात आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या अनेक स्पेस टेलिस्कोप लाँच करण्यात आल्या. यामुळे अवकाशीय पिंडासंदर्भातील समस्या काही प्रमाणात निकालात निघाली. यामुळे अनेक तारे आणि ग्रहांचा शोधही लागला. मात्र, अजूनही अद्ययावत स्पेस टेलिस्कोपची गरज असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते.

अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आता याच वर्षी एक आधुनिक स्पेस टेलिस्कोप लाँच करण्याच्या तयारीत आहे. या टेलिस्कोपचे नाव ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ असे आहे. या टेलिस्कोपकडून नासा व शास्त्रज्ञांना मोठ्या अपेक्षा आहेत. या टेलिस्कोपच्या मदतीने अशा एक ग्रहीय स्थितीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे, ज्यामध्ये आपल्या सूर्यापेक्षाही त्या तेथील सूर्य दुप्पट मोठा आहे.

या ग्रहीय स्थितीतील तारा हा आपल्या पृथ्वीपासून 63 प्रकाशवर्षे दूर आहे. खगोल शास्त्रज्ञांसाठी ही एक खास सूर्यमाला ठरणार आहे. या सूर्यमालेत किमान दोन ग्रह आहेत. याशिवाय त्यांच्याभोवती धुळीचे डिस्कही आहे. ‘बीटा पिक्टोरिस’ नावाची ही सूर्यमाला खगोल शास्त्रज्ञांसाठी एक गूढ बनले आहे.

कारण, धुळीच्या डिस्कमुळे या सूर्यमालेसंदर्भात जास्त माहिती मिळू शकत नाही. मात्र, ‘जेम्स वेब टेलिस्कोप’मुळे ही समस्या दूर होण्याची शक्यता आहे. बीटा पिक्टोरिसचा 1980 मध्ये शोध लागला होता. यामधील तारा केवळ 2 कोटी वर्षांचा आहे. तर, आपला सूर्य 4.6 अब्ज वर्षांचा आहे.

Back to top button