महाराष्ट्रातील 'इतके' विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले | पुढारी

महाराष्ट्रातील 'इतके' विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव झुगारुन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिले. यामुळे आता रशिया – युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडला आहे. युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्यात आला आहे. युक्रेनमध्ये १८ हजार भारतीय नागरिक व विद्यार्थी आडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्याचे प्रयत्‍न सुरू आहेत. दरम्यान युक्रेनमधील भारतीय दुतावासाने भारतीयांसाठी आवश्यक सुचना जारी केली आहे.

दरम्‍यान, युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे ,पुणे, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, गडचिरोली, सोलापूर, नांदेड व इतर जिल्‍हातील असे एकूण १२०० विद्याार्थी अडकले आहे. भारत सरकारकडून या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काळजी घेतली जात आहे.

तसेच, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे जिल्ह्यातील तब्बल 77 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना भारतामध्ये एअर इंडियाच्या विमानाने आणण्यात येणार आहे. भारत सरकारने तशी तयारी पूर्ण केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील तीन तर चिपळूण, मंडणगड, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यातील एक अशा एकूण आठ विद्यार्थांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्यातील ७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी ३ विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेन येथे गेले असून, याबाबत ठाणे जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईन नंबरवर पालकांनी संपर्क साधला आहे. तर, अमरावतीमधील एकूण आठ विद्यार्थी असल्‍याची माहिती अमरावती आपत्‍ती व्यवस्‍थापन विभागाने दिली आहे. नांदेड जिल्‍हातील जवळपास 200 विद्यार्थी अडकले आहेत.

आतापर्यंत जवळपास 320 विद्यार्थ्यांचा संपर्क झाला आहे अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता पुढाकार घेत आहे.

सरकारने अडकलेल्‍या विद्यार्थांसाठी नंबर आणि ईमेल जाहीर केला आहे. 02222027990, मोबाईल क्रमांक 9321587143 आणि ईमेल controlroom@maharashtra.gov.in असे जाहीर केले आहेत. आणि क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा ?

Back to top button