Nawab Malik Arrest : नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, ‘राष्ट्रवादी’ने केले स्पष्ट | पुढारी

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही, ‘राष्ट्रवादी’ने केले स्पष्ट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : 

केंद्र सरकारच्या चुकीच्या बाजू चव्हाट्यावर आणल्यानेच भाजपाने ईडीला हाताशी धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, मलिक यांना अटक झालेली असली तरी त्यांचा न्यायदेवतेपुढे गु्न्हा सिद्ध झालेला नाही. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केल आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्यापासून (दि. २३) राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेसतर्फे आंदोलन पुकारण्यात आल्याचेही भुजबळ यांनी जाहीर केले.

सत्तेचा वापर विरोधकांना बदनाम करण्यासाठी!

जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात किंवा यंत्रणेच्या विरोधात स्वच्छ भूमिका मांडत आहेत, त्यांना त्रास देण्याचा प्रकार घडत आहे. मलिक उघडपणे बोलत असत. त्यामुळे आज ना उद्या कधीतरी हे घडेल याची खात्री होती. कोणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे. यात काही नवीन नाही. पण खरे काय हे कुणालाही माहिती नाही.मी राज्याचा मुख्यमंत्री असताना माझ्यावरही असाच आरोप झाला होता. त्यानिमित्ताने राज्यात एक वातावरण निर्माण झाले होते. आज त्या गोष्टीला 25 वर्ष झाली. पण आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करून सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरु आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  म्‍हणाले.

कायद्याची पायमल्ली

हा सत्तेचा दुरुपयोगाचा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. कोणतीही नोटीस न देता राज्यातील एका मंत्र्यांना घेऊन जाणे व अटक करणे ही कायद्याची पायमल्ली आहे. हे वर्तन देशाच्या संघराज्य व्यवस्थेच्या विरोधातील आहे. मलिक यांच्यावर राग काढण्याचे काम सुरू झाले आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

अटकेमागे सत्तेची चटक

ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकारने घडवून आणलेल्या अटकेमागे भाजपामधील सत्तेची चटक आहे. केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे. भाजपाचा हा नवा धंदा आहे. असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वक्‍तव्य केले.

फडणवीस यांच्याकडून सरकार पाडण्याचे कारस्थान!

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावरच ईडी कारवाई करत आहे. मोदी सरकार केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करत आहे. माजी खासदार माजिद मेमन म्‍हणाले.

सत्य बोलणार्‍यांच्याच मागे ईडी!

आम्ही सातत्याने सत्य बोलत आहोत. अशा लोकांच्या मागे ईडी आणि सीबीआय लावली जात आहे. भाजपा नेत्यांची आम्ही सगळी प्रकरणे ईडीकडे देणार आहोत. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात ईडीच्या तपास यंत्रणा लावल्या जात आहेत. 2024 नंतर आम्ही सुध्दा भाजपा नेत्यांच्या मागे अशा तपास यंत्रणा लावू असे शिवसेना नेते  संजय राऊत म्‍हणाले.

भाजपामध्ये नैराश्य!

मागील दोन वर्षात केंद्र सरकारने केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून कारवाया सुरु केल्या आहेत. महाराष्ट्राची सत्ता हातून गेल्यापासून भाजपाच्या नेत्यांना नैराश्य आले आहे. काहीही करून हे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. भाजपाच्या अशा कारवायांना महाविकास आघाडी भीक घालत नाही. महाराष्ट्राची जनताच आता भाजपाला त्यांची जागा दाखवून देईल. काँग्रेस नेते नसीम खान म्हणाले.

हे ही वाचा  

Back to top button