औरंगाबाद : स्फोट झालेल्या कारमधील जोडप्याच्या नग्न मृतदेहांचे गूढ कायम | पुढारी

औरंगाबाद : स्फोट झालेल्या कारमधील जोडप्याच्या नग्न मृतदेहांचे गूढ कायम

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा 

आडरानात उभ्या कारमध्ये एसीचा स्फोट झाल्याने गुदमरून व होरपळून जोडप्याचा मृत्यू झाला. कारचा आतील भाग जळला आहे. ही दुर्घटना काल (बुधवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गांधेली शिवारात घडली. रोहिदास गंगाधर आहेर (वय 48, रा. जवाहर कॉलनी), शालिनी सुखदेव बनसोडे (वय 35,रा. उल्कानगरी) अशी मृतांची नावे आहेत.

या विषयी अधिक माहिती अशी की, रोहिदास हे मूळचे वैजापूर तालुक्यातील रहिवासी होते. ते कुटुंबीयांसह 2004 पासून कामानिमित्त औरंगाबादेत राहायला आले होते. पूर्वी ज्योतीनगरमध्ये राहत होते. काही वर्षांपासून ते जवाहर कॉलनीत राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. दोन मुली विवाहित आहेत. तर शालिनी या धुणी-भांडी करीत होत्या. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्या घराबाहेर पडल्या होत्या. चिकलठाणा पोलिस व नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहिदास हे अथर्व बिल्डर्सचे मालक रवींद्र जैन यांच्याकडे चालक म्हणून काम करीत होते. बुधवारी सकाळी कामावर जाताना ते मोपेड घेऊन जाऊ का?, असे पत्नीला म्हणाले, परंतु मोपेडचे काम असल्याने त्यांनी नेली नव्हती. दरम्यान, दुपारी भाजीपाला आणण्यासाठी म्हणून ते जैन यांची कार (क्र. एमएच 20 डीजे 7259) घेऊन बाहेर पडले. त्यानंतर ते परतलेच नाहीत.

मोठा आवाज आला अन् पोलिसांना कॉल केला… 

चिकलठाणा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार सहारा सिटीच्या पाठीमागील भागात गट क्र.92 मध्ये आडरानात उभी केलेली होती. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कारमधून मोठ्या स्फोटाचा आवाज आला. जवळच असलेल्या एका शेतकर्‍याने ही माहिती परिसरातील लोकांना सांगितली. त्यांनी चिकलठाणा पोलिसांना हा प्रकार सांगितल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. रोडगे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली तेव्हा जोडपे कारमध्ये मागील सीटवर बेशुद्धावस्थेत आढळले. समोरील सीटवर कांदे, इतर किराणा साहित्य, भाजीपाला ठेवलेला होता. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही घाटीत पाठविले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, कारच्या क्रमांकावरून बिल्डर जैन यांना पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार रोहिदास यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आला. सायंकाळी पोलिस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलिस निरीक्षक देविदास गात यांनीही घटनास्थळी पाहणी केली.

ज्वलनशील पदार्थामुळे झाला असावा स्फोट… 

कारमध्ये पोलिसांना भाजीपाला, किराणा साहित्य आढळले. गहू व तांदूळही जळाल्याचे दिसून आले. याशिवाय लायटर व सिगारेटची थोटकेही कारमध्ये पडलेली होती. कारला आतून असलेले प्लास्टिकचे आवरण जळालेले होते. काही तरी ज्वलनशील पदार्थ एसीतील गॅसच्या संपर्कात गेल्याने स्फोट झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे.

Back to top button