शिवजयंतीला पन्हाळगडाचा मुख्य मार्ग बंद | पुढारी

शिवजयंतीला पन्हाळगडाचा मुख्य मार्ग बंद

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा
19 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या शिवजयंतीसाठी शिवज्योत नेण्यासाठी किल्ले पन्हाळगडाचा मुख्य मार्ग बंद राहणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पर्यायी रेडे घाट मार्ग फक्‍त मोटारसायकलसाठी व पायी प्रवासासाठी सुरू राहणार असल्याची माहिती मंगळवारी तहसीलदार रमेश शेंडगे व मुख्यधिकारी तथा प्रशासक स्वरूप खारगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रस्ता खचलेल्या ठिकाणी सुरू असलेली दुचाकी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण बंद करण्यात आली आहे, असेही शेंडगे यांनी सांगितले.

पन्हाळगडाचा मुख्य रस्ता खचल्याने व रस्ता बांधकाम सुरू असल्याने मुख्य मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला आहे. शिवजयंती निमित्त महाराष्ट्र व कर्नाटकमधून शिवभक्‍त पन्हाळ्यात शिवज्योत नेण्यासाठी येतात. शिवभक्‍तांना शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी पर्यायी रेडे घाट मार्ग आहे; पण हा मार्ग अरुंद असल्याने वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून या मार्गावरून चारचाकी वाहनांना गडावर येण्यास बंदी केली आहे. या पर्यायी मार्गावरून चालत अथवा दुचाकीवरून शिवज्योत प्रज्वलित करून नेण्यासाठी सोडण्यात
येणार आहे. प्रशासनाच्या वतीने शिवभक्तांनी गडावर चारचाकी गाड्या न आणता, बुधवर पेठ येथे गाड्या पार्किंग करुन पर्यायी मार्गावरून चालत अगर दुचाकीवरून गडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरातून शिवज्योत प्रज्वलित करून पन्हाळा पायथ्याशी बुधवारपेठ येथून चारचाकीतून मार्गस्थ व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पन्हाळा शहरात येण्याकरिता पर्यायी रस्ता बुधवारपेठ- रेडेघाट- लता मंगेशकर बंगला ते अंधारबाव असा सुरू असून हा मार्ग अरुंद असल्याने या मार्गाने 18 फेब्रुवारी सायंकाळी 6 पासून ते 19 फेब्रुवारीदरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत फक्‍त दुचाकी वाहनांना व पायी येणार्‍या शिवभक्‍तांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. या कालावधीत या पर्यायी मार्गाने दुचाकी व्यतिरिक्‍त सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. शिवजयंती उत्सवानिमित्त येणार्‍या शिवभक्‍तांच्या वाहनांकरिता पार्किंग सोय पन्हाळा पब्लिक स्कूल, बुधवार पेठ व हॉटेल पूजा ग्रीनलँड येथे करण्यात येणार आहे. सायलेन्सर नसलेल्या दुचाकी वाहनांना प्रवेश बंद असून अशी वाहने आढळल्यास पोलिस विभागामार्फत वाहन जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

कडक पोलिस बंदोबस्त
पन्हाळा पोलिस ठाण्याकडील 3 पोलिस अधिकारी व 20 अंमलदार यांच्यासह बाहेरून 7 पोलिस अधिकारी व 80 पोलिस अमलदार, तसेच 20 वाहतूक शाखेचे पोलिस अमलदार, 40 होमगार्ड, तसेच 3 स्ट्रायकिंग फोर्स असा कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांनी दिली.

हेही वाचलतं का? 

Back to top button