‘अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्स होण्याचे सोडा, पण सात वर्षात ५.३५ ट्रिलीयन डॉलर्सचा बँक घोटाळा’ | पुढारी

'अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर्स होण्याचे सोडा, पण सात वर्षात ५.३५ ट्रिलीयन डॉलर्सचा बँक घोटाळा'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. ते साध्य होण्याचे सोडाच; देशात गेल्या 7.5 वर्षांत 5.35 ट्रिलियन रुपयांचे बँक गैरव्यवहार मात्र झाले, अशा शब्दांत सोमवारी काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

पक्षाचे प्रवक्ते प्रा. गौरव वल्लभ पत्रकार परिषदेत म्हणाले, बँकिंग क्षेत्रात दररोज सरासरी 195.5 कोटी रुपयांची फसवणूक होत आहे. लुटा आणि सुटा अशी मोदी सरकारची फसवणूक करणार्‍यांसाठी प्रमुख योजना आहे. 22,842 कोटींचा गैरव्यवहार हा त्यातलाच एक प्रकार आहे, अशी जोरदार टीकाही वल्लभ यांनी केली. 22 हजार कोटींच्या घोटाळ्यासंबंधात 8 नोव्हेंबर 2019 रोजी सीबीआयकडे तक्रार नोंदवण्यात आली होती.

काँग्रेस प्रवक्ते वल्लभ यांनी एबीजी शिपयार्डला गुजरात सरकारने 2007 मध्ये 1,21,000 चौरस मीटर जमीन दिली होती. कॅगने गुजरात सरकारला एबीजी शिपयार्ड आणि ऋषी अग्रवाल यांना 1400 रुपये प्रति चौरस मीटर भाव असलेली जमीन 700 रुपये दराने दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. त्यावेळी मुख्यमंत्रिपदावर नरेंद्र मोदी होते, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे कॅगच्या अहवालानंतरही मोदींच्या नेतृत्वाखालील तत्कालीन गुजरात सरकारने दहेज येथील 50 हेक्टर जमीन एबीजी शिपयार्ड आणि ऋषी अग्रवाल यांना दिली. एबीजी शिपयार्डने हा प्रकल्प 2015 मध्ये बंद केला होता.

Back to top button