सातारा : उद्योगांसाठी केंद्राच्या योजना आणणार | पुढारी

सातारा : उद्योगांसाठी केंद्राच्या योजना आणणार

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सरकारला 45 टक्के उत्पन्न हे असंघटीत व लघु उद्योगातून मिळते. मात्र, कोरोनामुळे या प्रकारच्या उद्योगधंद्यांवर मोठा परिणाम आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार निर्माण केले जातात. या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात रोजगार मिळवून देण्यासाठी उद्योगांना चालना देणार असून त्याअनुषंगाने केंद्राच्या योजना जिल्ह्यातील उद्योगांसाठी आणणार असल्याची ग्वाही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

खा. उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे यांची दिल्लीत भेट घेतली. यावेळी खा. उदयनराजेंनी ना. राणे यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या विभागाच्या माध्यमातून सातार्‍यात सुशिक्षित बेरोजगार आणि होतकरु तरुण उद्योजकांसाठी लवकरच उद्योजक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.

जिल्ह्यातील पारंपारिक हस्तकला कारागिरांना प्रोत्साहन देण्याकरता केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गंत मध्यवर्ती सुविधा केंद्र सुरु व्हावे. केंद्रीय लघु व मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून छोटया उद्योजकांना निधी उपलब्ध करुन दिला जातो. तो निधी मिळवून देण्याचा प्रयत्न राहील. या विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तरुणांना उद्योग उभारणी प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही खा. उदयनराजेंनी सांगितले.

देशातील सुमारे 45 टक्के उत्पन्न असंघटीत व लघू उद्योगातुन मिळते. विशेषतः ग्रामीण व्यवसाय आणि कुटीर उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्राने विविध योजना सुरु केल्या आहेत. याचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यासह महाराष्ट्रातील युवकांना मिळवून देण्याचा प्रयत्न राहिल, असे आश्वासनही खा. उदयनराजेंनी दिले.

Back to top button