कोकण पाऊस अपडेट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे थैमान | पुढारी

कोकण पाऊस अपडेट : रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे थैमान

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोकण पाऊस अपडेट : पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाने तांडव सुरु केलं आहे. धुवाँधार पावसाने चिपळूणमध्ये महाप्रलय केला आहे. शहराला पाण्याने वेढा दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाने थैमान घातले आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी, सिधुदूर्ग चे जिल्हाधिकारी कोकण विभागीय आयुक्त, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब, सिधुदूर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालक मंत्री आदीची तटकरे यांच्याशी केली चर्चा.

तत्काळ आपतकालीन विभागाकडून सर्व मदत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. पूराने वेढलेल्या गावातील आणि शहरांतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेलिकाँप्टरचीही मदत घेण्याचे आदेश दिले.

पूरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढन्यासाठी अतीरीक्त बोटी तात्काळ पोहवण्याचेही आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

कोकण पाऊस अपडेट 

सिंधुदुर्ग : माणगांव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात आभाळ फाटलं!

माणगांव खोऱ्यातील सह्याद्री पट्ट्यात गेल्या 24 तासात पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे कर्ली नदीला महापूर आला, परिणामी कर्ली नदीवरील आंबेरी पुलासह दुकानवाड, हळदीचे नेरूर, उपवडे, शिवापुर आधी सर्व कॉजवे पाण्याखाली गेले आहेत.

विशेष म्हणजे कुडाळहुन शिवापूरकडे जाणाऱ्या मार्गावर पावसात पर्यायी मार्ग म्हणून आधार असलेल्या काही लोखंडी पुलांवरुन पाण्याचा जोरदार प्रवाह आदळत होता.त्यामुळे पुलांवरुन ये-जा बंद झाली होती.एकुणच पावसामुळे या भागातील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे.

गेली चार दिवस कुडाळ तालुक्यासह जिल्हाभरात पावसाने मुक्काम ठोकला आहे. अशातच कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यात बुधवारपासून अतिवृष्टी सदृश्य पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवून दिली आहे.

पावसाचा कहर सुरू असून पुले पाण्याखाली गेल्यानंतरचे ये-जा करण्याचे पर्यायी मार्ग सुद्धा बंद झाले आहेत.

कुडाळ शिवापूर या मुख्य मार्गावरील आंबेरी पूल पाण्याखाली गेल्यामुळे 27 गावांचा संपर्क तुटला आहे. या ठिकाणच्या सखल भागातील भातशेती सुध्दा पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत.

नदीकिनारी नव्याने लागवड केलेली  भात रोपे वाहून जाण्याचा धोका असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट आहे.

एकुणच अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे येथील नागरिकांची झोप उडाली आहे.पावसाचा जोर सह्याद्री पट्यात अधिक असला तरी खलाटी (खालच्या पट्यात) मात्र तितकासा जोर दिसून येत नाही.

वैभववाडी

वैभववाडी तालुक्यात पावसाने कहर केला आहे. रात्रंदिवस धो धो पाऊस कोसळत आहे. या पावसाने तालुक्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तालुक्यातील प्रमुख असलेल्या अरुणा, शुक, शांती गोठणा, शिवगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

वैभववाडी फोंडा मार्गावर लोरे येथे पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग सकाळी ११.वा पासून बंद आहे. वैभववाडी उंबर्डे मार्गावर सोनाळी येथे पुलावर व कॉजवेवर पाणी आल्यामुळे हा मार्गही सकाळपासूनच बंद झाला आहे.

तिथवली जामदा पुलावर पाणी आल्यामुळे खारेपाटण गगनबावडा मार्ग बंद झाला आहे. या प्रमुख मार्गाबरोबरच ग्रामीण भागातील पुल व कॉजवेवर पाणी आल्यामुळे वैभववाडी नावळे, वैभववाडी कुर्ली हे मार्गही ठप्प झाले आहे. शुक नदीने धोक्याच्या पातळी ओलांडली असून नापणे जैतापकरवाडी येथे अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे.

भुईंबावडा घाटमार्गातून सुरु असलेली अवजड वाहतूक गुरुवारपासून बंद

भुईंबावडा घाटमार्गातून सुरु असलेली अवजड वाहतूक गुरुवारपासून बंद करण्यात आली आहे.सध्या करुळ घाटमार्ग बंद असल्यामुळे भुईबावडा घाटमार्गातून वाहातूक सुरु होती.

अवजड वाहतुकीमुळे भुईबावडा ते वैभववाडी दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता खचत चालला आहे. तसेच भुईबावडा घाटातही रस्ता खचलेला असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील अवजड वाहातूक बंद करण्याची मागणी तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार या मार्गावरील अवजड वाहातूक बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेताला आहे.

Back to top button