कोरोना चा छडा लावणारा ब्रिद अ‍ॅनालायझर

अ‍ॅम्स्टरडॅम ः कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात विषाणू संक्रमणाचे निदान करण्यासाठी अनेक संशोधने होत आहेत. वेळीच निदान झाले तर लवकर उपचार होऊन माणूस बरा होऊ शकतो. त्यामुळे अशा उपकरणांचे अतिशय महत्त्व असते.

आता एका कंपनीने असे ब्रिद अ‍ॅनालायझर बनवले आहे जे एखाद्या व्यक्‍तीचा श्‍वास तपासूनच तो कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे सांगू शकतो. या उपकरणाचा नेदरलँडमध्ये वापरही सुरू झाला असून अमेरिकेत अशा प्रकारच्या उपकरणाच्या वापरासाठी परवानगी मागण्यात आली आहे.

डच कंपनी ब—ेथोमॅक्सने हे ‘स्पिरोनोज’ नावाचे श्‍वासावर आधारित कोरोना टेस्ट उपकरण बनवले आहे. मे मध्ये सिंगापूरच्या हेल्थ एजन्सीने ब—ेथोमॅक्स आणि सिल्व्हर फॅक्टरी टेक्नॉलॉजीद्वारे बनवलेल्या दोन श्‍वासाधारीत चाचण्यांना प्रोव्हिजनल ऑथरायजेशन दिले आहे.

अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी म्हटले आहे की त्यांनी आपल्या ‘कोव्हिड-19’ ब्रिद अ‍ॅनालायजरच्या इमर्जन्सी ऑथरायजेशनच्या वापरासाठी अमेरिकन अन्‍न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला आहे. इंग्लंडमध्ये लाफबॉरो युनिव्हर्सिटीमधील एक केमिस्ट पॉल थॉमस यांनी सांगितले की श्‍वासाने कोरोना संक्रमणाचा छडा लागू शकतो हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

ही ‘विज्ञानकथा’ नसून हे वास्तव आहे. संशोधक दीर्घकाळापासून अशा पोर्टेबल डिव्हाईससाठी प्रयत्न करीत होते जे एखाद्या व्यक्‍तीच्या केवळ श्‍वासावरून आजाराचे निदान करू शकेल. तसेच अशा प्रकारचे स्क्रिनिंग पेनलेस म्हणजेच वेदनारहीतही असेल.

Back to top button