Ashleigh Barty : ॲशलेघ बार्टीने रचला इतिहास, कॉलिन्सचा पराभव करून पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद | पुढारी

Ashleigh Barty : ॲशलेघ बार्टीने रचला इतिहास, कॉलिन्सचा पराभव करून पटकावले ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

मेलबर्न; पुढारी ऑनलाईन : टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ॲशलेघ बार्टीने (Ashleigh Barty) शनिवारी (दि. २९) इतिहास रचला. तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. ॲशलेघ महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्स हिचा ६-३, ७-६ (७-२) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मेलबर्नमधील रॉड लेव्हर एरिना येथे हा सामना रंगला होता. महत्त्वाची बाब म्हणजे ॲशलेघ बार्टीने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.

ऑस्ट्रेलियाची स्टार खेळाडू बार्टीने २८ वर्षीय कॉलिन्सवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. पण खरा थरार दुसऱ्या सेटमध्ये दिसून आला. अमेरिकन खेळाडूने दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ केला. कॉलिन्सने सुरुवातीलाच दोनदा बार्टीची सर्व्हिस मोडून सर्वांना आश्चर्यचकित केले. याचबरोबर ॲशलेघ १-५ अशी पिछाडीवर पडली. हा सामना तिसऱ्या सेटपर्यंत जाईल असे वाटत होते, परंतु बार्टीने शेवटच्या क्षणी कॉलिन्सची सर्व्हिस मोडली. तिने सामन्यात जोरदार कमबॅक करत स्कोअर २-५ असा केला. येथून पुढे बार्टीच्या आक्रमक खेळाला रोखणे कठीण झाले. दुस-या सेटमध्ये सामना ५-५ अशा बरोबरी आला आणि सामना टायब्रेकमध्ये गेला. त्यानंतर टायब्रेकरमध्ये दुसरा सेट ७-६ (७-२) असा जिंकून ॲशलेघ बार्टीने आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. तिने यापूर्वी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे.

Back to top button