डिसले गुरुजींसाठी आंदोलन; शिक्षक संघटनांमध्ये फूट | पुढारी

डिसले गुरुजींसाठी आंदोलन; शिक्षक संघटनांमध्ये फूट

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा

ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्‍त रणजित डिसले यांच्यावर शिक्षण विभागाकडून अन्याय होत असल्याने याविरोधात सोमवारी शिक्षक समन्वय
समितीकडून आंदोलन करण्याचा इशारादिला होता. मात्र समन्वय संघटनेत मतभिन्‍नता निर्माण झाल्याने संघटनेत फूट पडली आहे. त्यामुळे आंदोलनात आम्ही सहभागी होणार नाही, असे काही शिक्षकांनी शिक्षणाधिकारी यांना समक्ष भेटून सांगितले आहे. रणजितसिंह डिसले यांना अमेरिका येथे शिष्यवृत्‍तीसाठी सहा महिन्यांची रजा आवश्यक होती.

मात्र शिक्षण विभागाकडून रजा मंजूर करण्यात येत नाही. रजा मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप डिसले गुरुजी यांनी केला होता. त्यामुळे हा विषय राज्यभरात चांगलेच चर्चेचा ठरला होता. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याप्रकरणात हस्तक्षेप करीत डिसले गुरुजी यांना रजा मंजूर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले होते. शिक्षणमंत्री यांच्या आदेशानुसार डिसले गुरुजी यांना रजा मंजूर करण्यात आली आहे.

मात्र यात डिसले गुरुजी यांना शिक्षण विभागाकडून त्रास दिल्याने शिक्षक समन्वय समितीकडून सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन  करण्याचा इशारा देण्यात आला होता. समन्वय संघटनात वाद निर्माण झाल्याने काही पदाधिकार्‍यांनी शिक्षणाधिकारी डॉ.किरण लोहार यांची भेट घेत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या विषयावरुन पुन्हा आता नव्या चर्चेला उधाण आली आहे.

हेही वाचलत का?

Back to top button