मी देवाला नारळ ठेवू शकत नाही का? : प्रतापसिंह राणेंची विचारणा - पुढारी

मी देवाला नारळ ठेवू शकत नाही का? : प्रतापसिंह राणेंची विचारणा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी सोमवारी सकाळी भूमिका देवीचे दर्शन घेवून, पत्नी विजयादेवी यांच्यासोबत मंदिरात देवीला नारळ ठेवला. त्यांच्या या देवदर्शनानंतर ते निवडणूक लढवणार का? किंवा त्यांच्या पत्नी विजयादेवी निवडणूक लढवणार का? अशा अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चाना उत्तर म्हणून मी देवाला नारळ ठेवू शकत नाही का? अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.

सोमवारी संध्याकाळी त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. बैठकीत काही ठोस निर्णय झाला नव्हता, मात्र त्यांच्या पत्नी विजयादेवी निवडणूक लढवतील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. पर्ये विधानसभा मतदारसंघातून राणे यांच्या सून डॉ. दिव्या राणे भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे सुनेविरुद्ध सासू असा लढा होणार की काय? याबाबतही चर्चा रंगल्या होत्या.

पर्ये मतदारसंघातून प्रतापसिंह राणे ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. १९८० पासून ते १० वर्षे सलग राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ६ वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. त्यांचे पुत्र विश्वजित राणे भाजपच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री आहेत.

राजकारणात कोणतीच नाती नसतात असे म्हणतात. मात्र प्रतापसिंह यांच्या प्रतिक्रियेमुळे तूर्तास तरी या चर्चा थांबल्या आहेत. पण नक्की काय होणार? सून विरुद्ध सासू, सुनविरुद्ध सासरे की सुनेसोबत सासू सासरे…? हे येत्या दोन दिवसातच कळेल.

हेही वाचलत का? 

Back to top button