ईद-ए-कुर्बान : गौरव, त्याग व बलिदानाचा सण

ईद-ए-कुर्बान हा सण त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाच्या भावनेचा आहे. त्यातून वर्षभर ऊर्जेच्या रूपामध्ये सामाजिक व पारमार्थिक कार्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा मिळते. आज बकरी ईद. त्यानिमित्त…

सलग दुसर्‍या वर्षी रमजान व बकरी ईद जागतिक कोरोना महामारीच्या काळात साजरी होत आहे. प्रशासनाने ही ईद साधेपणाने घरीच साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

वेळ, परिस्थिती व धर्माचा तकाजाही आपल्याला हेच सांगतो की, अशावेळी आपण शहाणपणाने व गांभीर्याने वागले पाहिजे.

कोरोनायोद्ध्यांनीअविरत व अविश्रांत दिलेली सेवा म्हणजे मोठा त्यागच म्हणावा लागेल. त्यांच्या समर्पणाला कायम्हणावे, याला शब्दच नाहीत.

हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये त्याग,सेवा, समर्पण व बलिदानाला अनन्य साधारण महत्त्व आहे, ज्याच्या आधाराने हे जग तरले आहे.

रमजान महिन्यामध्ये इस्लामच्या अनुयायांमध्ये नैतिक व सामाजिक जीवनमूल्ये रुजवली जातात. महिनाभर त्याची कसरत (सराव) केली जाते. ईद-ए-मिलादच्या माध्यमातून मुहम्मद (स.) पैगंबरांची जयंती त्यांच्या आदर्श व उदात्त जीवनाची शिकवण लोकांमध्ये रुजावी म्हणून
साजरी केली जाते.

मोहरमच्या काळात हजरत हुसैन (र.) व त्यांच्या सहकार्‍यांनी मानवतेच्या रक्षणासाठी जे बलिदान दिले, त्याची आठवण जागृत केली जाते आणि बकरी ईद (ईद-एकुबर्ान) म्हणजे हजरत इब्राहिम (अ.) यांनी एकेश्‍वर व मानवतेसाठी जे महान व पायाभूत कामकेले, त्याचे स्मरण व सन्मान केला जातो.

प्रेषित हजरत इब्राहम (अ.) त्यांची दोन मुले व पत्नी या सर्व कुटुंबाने एक ईश्‍वर व मानवतेसाठी अतोनात हालअपेष्टा सहन केल्या. आपले ज्ञाती बांधव व तेथील राजाचा विरोध व धुत्कार सहन करावा लागला.

अनेक कठीण प्रसंग जीवावर बेतले; परंतु त्यांनी घेतलेले व्रत सोडले नाही. देश त्याग करायची वेळ आली. पुढे मक्केत जाऊन त्यांनी काबागृहाची बांधणी केली. हजरत इब्राहिम (अ.) यांनी केलेले एकेश्‍वरवादाचे हेच काम पुढे हजरत मुहम्मद (स.) पैगंबर यांनी परिपूर्ण केले.

एकेश्‍वरवाद व मानवतेच्या या प्रवाहात अनेक प्रेषितांनी जीवन अर्पण केले. अगदी ह. आदम (अ.) यांच्यापासून ह. मुसा (अ.), ह. युसूफ (अ.), ह. नुह (अ.), ह. इस्माईल (अ.), ह. याकूब (अ.), ह. ईसा (अ.) या सर्वांनी एकेश्‍वर व मानवतेसाठी जे कार्य केले त्याला तोड नाही.

प्रचंड हालअपेष्टा व प्रसंगी जीवावर उदार होत त्यांनी ते कार्य केले आहे. हे कार्य त्यांनी केवळ आणि केवळ एक परमेश्‍वरावरील निस्सिम भक्‍ती आणि मानव व मानवतेप्रती असलेले अगाध प्रेम, आपुलकी व निष्ठा या खातरच केले.

या कार्यात त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाची जी भावना त्यांनी दाखवली, ती अद्वितीय आहे.

इस्लामच्या एक परमेश्‍वराच्या (अल्लाह) भक्‍तीचा मार्ग हा एकता, एकत्व, ऐक्य व अद्वैताचा मार्ग आहे. एकेश्‍वरवादातून माणसांमाणसातील सर्वप्रकारचे भेद, द्वैत, उचनीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, आपपर भाव संपून जाईल आणि त्यांच्यामध्ये एकता, ऐक्य व एकात्मता निर्माण होईल. लोकांमध्ये समता व बंधुभावरुजेल.

अनेकेश्‍वरवादातून निर्माण होणारी फिरका परस्ती (पंथभेद) नष्ट होईल. माणसांमध्ये प्रेम, आपुलकी निर्माण होईल. प्रत्येक माणूस परका वाटणार नाही. इतरांबद्दल आस्था व सहानुभूती वाटेल. सौहार्दाचे वातावरण तयार होईल. त्यांचे दु:ख, वेदना व अडचणी आपल्याच वाटतील.

त्यांच्या मदतीला धावून जाण्याची ताकत मिळेल. अल्लाहचा मार्ग हा जसा एक परमेश्‍वराच्या भक्‍तीचा आहे, तसाच तो गरीब, दीन, दुबळे,
वंचित, शोषित, पीडित, अन्याय, अत्याचारीत यांच्यासाठी लढाई लढण्याचा आहे.

याबाबत ‘कुराण’ अगदी बजावून सांगते. जे लोकांवर जुलूम करतात व मुलुखात हकनाक दांडगाई माजवितात, त्यांना परमेश्‍वर पसंत करत नाही.

(कु. 42:40-41). जे तन, मन, धन अर्पण करून परमेश्‍वराच्या मार्गात लढले, त्यांचा परमेश्‍वरासमीप दर्जा मोठा होय. त्यांचेच जीवन सार्थकी लागेल. (कु.9:20). हा सत्य आणि न्यायाचा मार्ग आहे. केवळ स्वतःपुरते बघण्याचा व स्वतःच्या कल्याणाचा मार्ग नाही.

म्हणूनच तो मानवतेचा व सामाजिक कल्याणाचा मार्ग आहे. यावर कुराण अगदी विशेष जोर देते. न्यायाने वागा. अन्यायाचे प्रवर्तक होऊ नका. परमेश्‍वरासाठी न्यायपुरस्सर साक्ष देण्यास खंबीर व तत्पर राहा.

(कु.5:8). ‘कुराण’ आपल्या अनुयायांना यावर कायम राहण्याची ताकीद देते. रमजान महिन्यापासून सुरु झालेला शाश्‍वत, नैतिक व सामाजिक जीवनमूल्यांचा हा गौरव व उत्सव पवित्र मक्‍का मदिनाप्रती कृतज्ञतेच्या हाज यात्रेपर्यंत चालतो व शेवट ईद-ए-कुर्बानने होतो.

त्याग, सेवा, समर्पण व बलिदानाची ही भावना पुढे वर्षभर ऊर्जेच्या रूपामध्ये तुम्हाला सामाजिक व पारमार्थिक कार्यासाठी स्फूर्ती व प्रेरणा देत राहते. यातून सर्व प्रेषितांच्या कार्याचे स्मरण करावे व त्यासाठी केलेल्या त्याग, सेवा, समर्पण, निष्ठा व बलिदानाची भावना सर्वसामान्यांमध्ये रुजावी.

एक परमेश्‍वराची भक्‍ती करावी. मानवतेची सेवा घडावी, हाच उद्देश असे सण, उत्सव साजरे करण्यामागे आहे. ज्याने इस्लामचे सर्वोत्तम सत्य जाणिले, पवित्राचरण केले व परमार्थात दानधर्म केला, त्याला निश्‍चित सौख्य प्राप्त होईल, (कु.92:7) असे कुराणात म्हटलेच आहे.

Back to top button