अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ होणार सिंहासनारूढ | पुढारी

अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ होणार सिंहासनारूढ

सोलापूर ; जगन्नाथ हुक्केरी : भक्तांच्या प्रार्थनेला ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असा धीर देणार्‍या अक्कलकोटनिवासी स्वामी समर्थांच्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे काम मोठ्या गतीने सुरू आहे. गाभार्‍यासह मंडप आणि मंदिराला नव्याने झळाळी दिल्यानंतर मयुरासनाच्या रूपात स्वामी समर्थ यांची मूर्ती बसविण्यात येणार आहे. ती सिंहासनावर आरूढ करण्यात येणार आहे.

मंदिराच्या निर्मितीनंतर सुशोभीकरणाचे पहिल्यांदाच काम हाती घेण्यात आले आहे. देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी विविध देवस्थानचे पदाधिकारी आणि वास्तुविशारद यांच्याशी चर्चा करुन मंदिराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेत हे काम सुरू केले. यामुळे भाविकांना नव्या रुपातील मंदिरासह गाभार्‍यात विराजमान होणारी स्वामी समर्थांची मूर्ती भावणार आहे. 12 दिवसांपूर्वी हे काम हाती घेण्यात आले आहे. गाभार्‍याचे काम आता पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे.

हे काम लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी 20 हून अधिक राजस्थानी कारागिर कार्यरत आहेत. कोरोना महामारी आणि निर्बंधामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या कमी झाल्याने हे काम पूर्ण करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. गाभारा दगडाने बांधण्यात आला आहे. त्याला रंग दिल्याने मूळ दगडी रुप नष्ट झाले आहे.

नूतनीकरणात त्याला पुन्हा जुने दगडी रुप देण्यात येणार आहे. यामुळे गाभारा अधिकच खुलून दिसणार आहे. गाभार्‍यासमोर असलेल्या मंडपाचेही नूतनीकरण सुरु आहे. मंडप जुना आहे. आतील सळ्याही जीर्ण झाल्या आहेत. त्या बदलून त्याठिकाणी हेवी स्टीलपासून बनविलेले बार बसविण्यात येणार आहेत. नूतनीकरणाला साजेसे रुप देण्यासाठी उत्तम पद्धतीने पीओपी करण्यात येणार आहे.

तेथे झुंबरही बसविण्यात येणार आहे. यामुळे आकर्षक गाभार्‍यासमोर सजवलेला मंडप आणखी शोभून दिसणार आहे. यामुळे स्वामी समर्थ भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहेत. गाभार्‍याचा आतील भाग व गाभार्‍यासमोरील मंडपातील परिसराचे मार्बलीकरण करण्यात येत आहे. याशिवाय भाविकांच्या सोयीसाठी अनेक बदल करण्यात येत आहेत. मंदिर पसिरात सीसीटीव्ही, लाईट फिटिंग, पीओपी याशिवाय नूतनीकरणात आवश्यक असलेल्या अनेक बाबीही बदलण्यात येत आहेत. देवस्थान समितीबरोबरच भाविकांनीही या कामासाठी पुढाकार घेतला आहे.

1937 मधील मूर्ती

सध्या मंदिरात असलेली स्वामी समर्थांची मूर्ती ही 1937 मधील आहे. याच मूर्तीला मयुरासनाच्या रुपात सिंहासनावर आरुढ करण्यात येणार आहे. सिंहासनाला सोने आणि चांदीचे लेप देण्यात येणार आहेत. सिंहासन बनविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे. उडुपी येथील पुरोहितांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

नूतनीकरण सुरु असताना भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घेतली आहे. भाविकांनीही सहकार्य केले आहे. मंदिराचे नवे रुप सगळ्यांना भावणार आहे.
– महेश इंगळे
अध्यक्ष, वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान समिती, अक्कलकोट

राजस्थानी ब्राह्मण कारागिरांकडून काम

नैपुण्य मिळविलेले राजस्थानी कारागीर सध्या काम करत आहेत. प्रत्येक जण आपल्या कौशल्यात पारंगत आहेत. गाभार्‍याचे काम हे राजस्थानी ब्राह्मण कारागीर करत असून काम करताना ते पूर्ण सोवळ्यात आहेत. रात्रं-दिवस हे काम सुरू आहे. लवकरच आकर्षक मंदिर तयार झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्याचे नियोजन देवस्थान समिती करत आहे. नूतनीकरणामुळे मंदिराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. भाविकांना या कामाची उत्सुकता लागली आहे.

Back to top button