आगामी निवडणुकांसाठीही शिरोळ तालुका स्थानिक आघाडी | पुढारी

आगामी निवडणुकांसाठीही शिरोळ तालुका स्थानिक आघाडी

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : केडीसीसी निवडणुकीत राबविलेला पॅटर्न पुन्हा आगामी निवडणुकांत राबविण्यासाठी शिरोळ तालुक्यात नवी स्थानिक आघाडी स्थापन करण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुढाकार घेतला आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीतील ही आघाडी ठेवण्यासाठी गेल्या चार दिवसांपासून राजकीय खलबते सुरू आहेत.

माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे तीन नेते कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसत असल्याने शिरोळ तालुक्यातील राजकीय चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ना. यड्रावकर यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकत्र येऊन गणपतराव पाटील यांना निवडणुकीत उतरविले. या निवडणुकीत ना. यड्रावकरांनी एकहाती विजय मिळविला असला तरी या सर्वपक्षीयांनी मात्र एकमेकांची साथ सोडल्याचे दिसत नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर शिरोळ तालुक्यात विविध कार्यक्रम झाले. या कार्यक्रमात माजी खासदार शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील हे तीन नेते एकत्र दिसत आहेत.

माजी खासदार शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, भाजपचे अनिलराव यादव, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर, ‘मयूर’चे संजय पाटील यांसह विविध नेते एकत्रितरीत्या केडीसीसीची रणनीती कायम ठेवून स्थानिक आघाडीद्वारे आगामी निवडणुका लढविण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले आहे.

नगरपालिका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणूकीत शिरोळ तालुका स्थानिक आघाडी म्हणून ना.यड्रावकर यांच्या विरोधात लढणार आहे. शिरोळ तालुक्यात दिर्घकाळ राजकीय संघर्ष झाला आहे. पण, दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, सा.रे.पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी संस्कृती मोडली नाही. तसेच खालच्या पातळीवर सुरू असलेले राजकारण थोपविण्यासाठी स्थानिक आघाडी स्थापन करून निवडणूक लढविणार आहे.
– राजू शेट्टी, माजी खासदार

Back to top button