किंग कोहली : एका यशस्वी कर्णधारपदाची सांगता  | पुढारी

किंग कोहली : एका यशस्वी कर्णधारपदाची सांगता 

एक यशस्वी कर्णधार म्हणून कोहलीचे मूल्यमापन करायचे तर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकायचा पराक्रम, इंग्लंडमध्ये गेल्यावर्षी अर्धवट राहिलेल्या मालिकेत 2-1 अशी आघाडी, मायदेशातल्या सर्व मालिका जिंकायचा पराक्रम वगैरे मोजमापाच्या पट्ट्या लावून करता येईल; पण त्याचे खरे मोजमाप हे सामना जिंकणे ही त्याने प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने संघात उपलब्ध केले.

निमिष वा. पाटगावकर

भारताने द. आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी हरल्यावर विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. भारताने ही कसोटी मालिका हरणे एकवेळ अनपेक्षित होते. पण कोहली हा निर्णय घेणार हे जवळपास निश्चित वाटत होते. गेल्या चार महिन्यांतल्या घडामोडी पाहता कोहली हा निर्णय घेणार हे दिसत होते. प्रश्न होता फक्त वेळेचा. आपली शंभरावी कसोटी, द. आफ्रिकेतला पहिला-वहिला मालिका विजय अशा दुग्धशर्करा योगावर त्याने कर्णधारपद सोडले असते तर त्याच्या यशाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोचला गेला असता. पण नियतीला ते मंजूर नव्हते. फिटनेसचा बादशहा म्हणावे अशा कोहलीला दुसर्‍या कसोटीआधी पाठदुखीने ग्रासले आणि हा योग काही आला नाही. भारतात फेब्रुवारीत येणार्‍या दुबळ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवून तो कर्णधारपद सोडू शकला असता; पण गांगुली आणि कंपनीचे मनसुबे काय आहेत हे ओळखण्याच्या फंदात न पडता त्याने हा मार्ग निवडला.

कोहलीचे कसोटी कर्णधार बनणे आणि त्याने कसोटी कर्णधारपद सोडणे या दोन्ही नाट्यमय घटना होत्या; पण त्या दरम्यान होती ती एक यशस्वी कर्णधाराची कारकीर्द. 2011 सालचा वेस्ट इंडिज दौरा कोहलीचा पदार्पण दौरा होता. पदार्पणातल्या कोहलीला वेस्ट इंडिजचा फिडेल एडवर्डस् उसळत्या मार्‍याने सतावत होता. चेंडू कोहलीच्या चेहर्‍याजवळून सुसाट जात होते. कर्णधार म्हणून कोहलीच्या या शेवटच्या मालिकेला प्रशिक्षक असलेला राहुल द्रविड कोहलीबरोबर खेळपट्टीवर होता. त्याला वादळाला सामोरे जा हा सल्ला द्रविडने दिला. साधारण कुठल्याही जलदगती तोफखान्याचा स्पेल सात-आठ षटकांचा असतो, तेव्हा हे वादळ पचव. 5 डावांत फक्त 76 धावा केल्यावर विराट कोहलीला इंग्लंड दौर्‍यातून वगळण्यात आले. परंतु वेस्ट इंडिजमध्ये हरभजन बोलून गेला, हा मुलगा पुढच्या तीन वर्षांत भारताचा कर्णधार होईल. हरभजनची ही भविष्यवाणी कोहलीने खरी करून दाखवली. या वगळल्या जाण्याने कोहलीच्या जिद्दीचा नवा अध्याय सुरू झाला. जिद्द ही कोहलीच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. केवळ 18व्या वर्षी पितृछत्र हरवल्यावर, वडिलांचा अंत्यसंस्कार करून दुसर्‍या दिवशी तो दिल्लीसाठी रणजी खेळायला मैदानात होता. जेव्हा त्याने आरशात आपले शरीर एकदा बघितले आणि ठरवले, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर फिटनेसला पर्याय नाही.

त्या 2011 च्या इंग्लंड दौर्‍यावर जरी कोहलीला वगळले तरी वर्षअखेर घरच्या वेस्ट इंडिजच्या दौर्‍याविरुद्ध त्याने पुनरागमन करून नव्या अध्यायाची सुरुवात केली. त्याच्या फॉर्ममध्ये सातत्य होते; पण त्याच्या दर्जाची खरी चुणूक दिसली ती त्याचे पहिले कसोटी शतक त्याने अ‍ॅडलेडला काढले तेव्हा. तो सामना भारत हरला; पण चर्चा होती ती कोहलीच्या शतकाची. कर्णधार धोनीला मायदेशात यश मिळत होते; पण परदेशात मात्र अपयश हात धुऊन मागे लागले होते. विश्वचषकानंतरच्या इंग्लंड दौर्‍यापासून परदेशी विजय तो मिळवून देऊ शकत नव्हता. 2011 ते 2014 मध्ये दोन अनिर्णीत कसोटी आणि 1 लॉर्डस्वरचा विजय सोडला तर परदेशी भूमीवर विजय दुरापास्त झाला होता. धोनी हा कुठल्याच पदाला चिकटून राहणारा नव्हता; पण तरी 2014-15 च्या भर ऑस्ट्रेलिया दौर्‍यात धोनीने कसोटी कर्णधारपद आणि कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. त्या दौर्‍याच्या अ‍ॅडलेड कसोटीत धोनीच्या या निर्णयामुळे उपकर्णधार कोहली कर्णधार बनला. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच डावात त्याने तडाखेबंद 115 आणि दुसर्‍या डावात 141 धावा काढून कर्णधार म्हणून आपण धुरा सांभाळायला तयार आहोत हे दाखवून दिले. मेलबर्न कसोटीनंतर धोनी निवृत्त झाला आणि कोहलीचे कर्णधारपद कायम झाले.

कोहली एक कर्णधार म्हणून गांगुलीच्या पठडीतला होता. गांगुलीने विशेषतः गोर्‍यांना दाखवून दिले की, क्रिकेट खेळायला सरळ बॅटबरोबर सरळ कणाही लागतो. कोहली आक्रमकतेच्या बाबतीत गांगुलीच्या दोन पावले पुढेच होता. पण ही आक्रमकता त्याला स्वतःला ऊर्जा मिळवून देत होती. हे समीकरण कदाचित त्याच्या सहकार्‍यांना पटले नसेल. आपल्या सहकार्‍यांत संघातील स्थानाबाबत असुरक्षितता निर्माण करून त्यांची कामगिरी उंचावायची या तत्त्वाने कोहलीने एक कर्णधार म्हणून उदंड यश मिळवले; पण कोहली हा धोनीसारखा जनतेचा लाडका कर्णधार होता का? असा प्रश्न विचारला तर हो म्हणायला जीभ अडखळेल. अगदी कर्णधार म्हणून शेवटच्या कसोटीतही त्याने डीआरएसच्या निर्णयावर मैदानात शिमगा केला. तंत्रज्ञान चुकू शकते, मानवी चुका होऊ शकतात; पण खेळाचा एक भाग म्हणून या जंटलमन खेळात त्याने ते कधी मानलेच नाही. वास्तविक कोहलीने केलेला प्रकार बालिश होता. पण क्रिकेट जगताने हा कोहलीच्या खेळण्याचा भाग म्हणून स्वीकारले आहे. हे स्वीकारण्याला मुख्य कारण म्हणजे कोहली भारतीय संघाला मिळवून देत असलेले यश. जेव्हा यश तुमच्या पायाशी लोळण घेत असते तेव्हा शंभर गुन्हे माफ होतात.

विराट कोहलीच्या कर्णधारपदापासून पायउतार होण्यावर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने जे ट्विट केले ते कोहली एक कर्णधार म्हणून काय चीज होता हे सांगायला बोलके आहे. जाफर म्हणतो, विराट कोहलीने जेव्हा कर्णधारपद स्वीकारले तेव्हा परदेशी भूमीवरचा विजय ही मोलाची कामगिरी होती आणि आता भारतीय संघ परदेशी जिंकला नाही तर ते आश्चर्यकारक ठरते. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार त्याला का म्हणायचे हे सांगायला त्याची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे. कर्णधार म्हणून 68 सामन्यांत त्याने 40 सामन्यांत विजय मिळवला तर 17 सामन्यांत हार पत्करावी लागली. या विजयात 24 भारतीय भूमीवरचे, तर तब्बल 16 विजय परदेशी भूमीवरचे आहेत. कोहलीची जिंकण्याची टक्केवारी 58.8 टक्के ठरते. गांगुलीची 49 सामन्यांत 21 विजयांसह हीच 42.8 टक्के भरते तर धोनीची 60 सामन्यांत 27 विजयांसह ती 45 टक्के भरते. कोहली भारताचा यशस्वी कर्णधार तर आहेच; पण जागतिक क्रिकेटमध्येही तो यशाच्या टक्केवारीत तिसरा ठरतो. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ 57 सामन्यांत 41 विजयांनी 71.9 टक्क्यांनी पहिल्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचाच रिकी पाँटिंग 77 सामन्यांत 48 विजयांनी 62.3 टक्क्यांनी दुसर्‍या स्थानावर आहे.

या आकडेवारीइतकीच महत्त्वाचे होते ते म्हणजे संघात जी आक्रमक संस्कृती त्याने आणली, त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ भारतीय संघाला वचकून राहायला लागले. कुणाच्या ‘अरे ला का रे’ म्हणायला आपले खेळाडू कचरेनासे झाले. कुठल्याही कर्णधाराला यशस्वी व्हायला जोड असावी लागते ती त्या कर्णधाराच्या विचारसरणीला पूरक मते असलेल्या प्रशिक्षकाची. कोहलीने जेव्हा 2014-15 ला कर्णधारपद स्वीकारले तेव्हा प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांचा कार्यकाळ संपत होता. त्यानंतर हंगामी काळासाठी रवी शास्त्री, मग अल्पकाळासाठी संजय बांगर, त्यानंतर कुंबळे आणि 2017 पासून पुन्हा रवी शास्त्री.

रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्यात सर्वात सामायिक गुण कुठले असतील तर जिद्द आणि महत्त्वाकांक्षा. रवी शास्त्री आपल्या मर्यादित गुणवत्तेवर जिद्दीच्या जोराने अकराव्या क्रमांकापासून सलामीवीर झाले. नुसते सलामीवीरच नाही तर एक अष्टपैलू म्हणून नावाजले गेले. शास्त्रींनी कोहलीला पूर्ण मोकळीक दिली. एक व्यक्ती म्हणून शास्त्री आणि कोहली यांच्या विचारसरणीत कमालीचे साम्य होते. रवी शास्त्रींना गुणांची उत्तम पारख होती. म्हणून त्यांनी गोलंदाज प्रशिक्षक म्हणून भारती अरुण यांना, तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून श्रीधर यांना आणले. भारती अरुण यांच्या नावाला मंडळात अंतर्गत विरोध होता. पण शास्त्रींनी प्रशिक्षक म्हणून तेच हवेत याचा आग्रह केला. याचा परिणाम म्हणून पुढल्या काही वर्षांत प्रतिस्पर्धी संघात धडक भरवणारी जलद गोलंदाजांची फळीच तयार झाली. कोहलीच्या यशात विशेषतः परदेशी मिळवलेल्या विजयात या गोलंदाजांचा महत्त्वाचा वाटा होता. प्रतिस्पर्ध्याचे वीस बळी मिळवल्याशिवाय विजय मिळत नाही हे जाणून कोहलीने पाच गोलंदाज खेळवायचे धाडसी निर्णय अनेकदा घेतले आणि त्याची परिणती यशात झाली.

एक यशस्वी कर्णधार म्हणून कोहलीचे मूल्यमापन करायचे तर ऑस्ट्रेलियात मालिका जिंकायचा पराक्रम, इंग्लंडमध्ये गेल्यावर्षी अर्धवट राहिलेल्या मालिकेत 2-1 अशी आघाडी, मायदेशातल्या सर्व मालिका जिंकायचा पराक्रम वगैरे मोजमापाच्या पट्ट्या लावून करता येईल; पण त्याचे खरे मोजमाप हे सामना जिंकणे ही त्याने प्रक्रिया बनवली आणि त्यासाठी लागणारे सर्व घटक त्याने संघात उपलब्ध केले. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील पहिल्या कसोटीतील अ‍ॅडलेडच्या दारुण पराभवानंतर कोहली पितृत्वाच्या रजेसाठी मायदेशी परतला. अजिंक्य रहाणेने पुढे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला; पण मालिका जिंकल्यावर कोहलीने तयार केलेल्या प्रक्रियेचा हा परिणाम होता हे नम्रपणे कबूल करण्याचा मनाचा मोठेपणाही दाखवला. कोहलीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत मुख्य उणीव काय राहिली असेल तर ती एकही आयसीसी स्पर्धेचे अजिंक्यपद न मिळवल्याची. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानकडून पराभवाची नामुष्की, न्यूझीलंडकडून 2019 चा विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव हे भारतीय संघ फेव्हरिट समजला असताना झाल्याने कोहलीच्या आणि सर्वच भारतीयांच्या जास्त जिव्हारी लागले.

कोहली कितीही आक्रमक असला, मैदानावर आपल्या सहकार्‍यांच्या चुकांवरच चेहर्‍यावरच्या हावभावांवरून तो प्रतिक्रिया देत असला किंवा वेळप्रसंगी पंचांच्या निर्णयावर शिक्षेची पर्वा न करता नाराजी व्यक्त करत असला तरी त्याच्यामुळे मैदानात भारतीय संघात एक ऊर्जा संचारलेली असायची. निव्वळ फलंदाज कोहली बघायला लागल्यापासून कर्णधार कोहलीचे महत्त्व जास्त पटायला लागले. कर्णधार म्हणून त्याच्या यशस्वी कारकिर्दीची हीच मोठी पावती आहे.

Back to top button