व्यक्तिचित्र : नृत्यकलाविश्वातील आधारवड हरपला | पुढारी

व्यक्तिचित्र : नृत्यकलाविश्वातील आधारवड हरपला

पंडित बिरजू महाराजांनी जो वारसा दिला आहे तो अद्वितीय आहे. त्यांची कलासृष्टी अद्भुत होती. महाराजांचे शिष्यगण सबंध जगभरात विस्तारलेले आहेत. त्यांची प्रेरणा, शिकवण्याची शैली, त्यांचं गुरुत्व या सर्व गोष्टींचा विचार केल्यास कलाविश्वातील एक महान वटवृक्ष कोसळल्याची भावना मनात येते.

सोनल मानसिंह

पंडित बिरजू महाराजांची कलात्मकता अतुल्य होती. त्यांची छटा, अदाकारी, त्यांची शैली पाहता लखनौ घराण्याने ते पूर्णपणे व्यापलेले होते. ते तबला वाजवत, ढोलक आणि पखवाज देखील वाजवत. त्यांचे स्वरही सुमधूर होते आणि नृत्याबाबत तर काय सांगावं ! बैठी नृत्यकला सादर करण्यात महाराज माहीर होते. कथ्थकसाठी जेव्हा व्यासपीठावर यायचे, तेव्हा कसलेला, समर्पित भावांचा बहुगुणी कलाकार आपली कला सादर करणार असल्याचे स्पष्ट व्हायचे. त्यांना हात उचलण्याची गरज भासत नसे. कथ्थक असो वा अन्य कोणत्याही नृत्यकलेमध्ये केवळ नाचणं हेच महत्त्वाचं नसतं. त्याबरोबरीनं चेहर्‍यावरील हावभाव, हातांच्या हालचाली याही महत्त्वाच्या असतात. पंडितजींच्या नृत्याविष्कारांंमध्ये या सार्‍याचा अद्वितीय मिलाफ पाहायला मिळायचा. त्यामुळंच एखादं चित्र देखील ते लीलयारीतीनं साकारायचे.

त्यांनी आपल्या कलाज्ञानार्जनातून शिष्यमंडळीच नव्हे तर एक कुटुंबच तयार केलं. एखाद्याला शिकवायचं आणि लगेच निघून जायचं अशी व्यावसायिक धाटणीची फळी त्यांनी तयार केली नाही. गुरू आणि शिष्यातल्या नात्याची प्राचीन परंपरा त्यांनी जोपासली. त्यांचं शिष्यांसोबतचं नातं अनौपचारिक होतं. प्रत्येक शिष्याबरोबर त्यांची आत्मियता होती. त्यामुळेच शिष्य देखील गुरुंप्रती संपूर्णपणे समर्पित भावनेनं समरसून शिकत असत. बिरजू महाराजांकडे लखनौच्या कालका-बिंदादीन घराण्याचा वारसा होता. त्यांनी कथ्थकमध्ये नृत्याच्या अनेक कलांची रचना केली. त्यांनी सादर केलेले गोवर्धन लीला, माखन चोरी, मालती माधव, कुमार संभव यांसारखे नृत्यप्रकार पाहून लोक मंत्रमुग्ध व्हायचे. ठुमरी, पद, गीत, दोहा आदींमध्ये ते निष्णात होते.

त्यांच्या वडिलांचे निधन खूपच लवकर झाले. त्यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला. पण पंडितजींवर गुरू आणि आई-वडिलांचा एवढा आशीर्वाद होता, की प्रसिद्धीने त्यांच्या पायावर लोळण घातली. कथ्थक नृत्याला त्यांनी एक वेगळाच सन्मान मिळवून दिला आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेला.

माझं आणि महाराजांच्यातील मैत्रीचं पर्व 1980 च्या दशकाच्या प्रारंभी सुरू झालं. माझ्या वाढदिवसानिमित्त मित्रांनी एका कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. त्यात बिरजू महाराज आले होते. त्यानंतर आमच्यातील मैत्री वाढली. स्नेहभाव वृद्धिंगत होत गेला. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. पण त्यांचे आप्तेष्ट, शिष्यगण आदी मंडळी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देत होती. हे त्यांनी केलेल्या प्रेमाचं फळ होतं. अशा लोकांचं जाणे हे न भरून येण्यासारखं आहे.

वयाच्या 18-20 व्या वर्षी त्यांनी दिल्लीत संगीत भारतीत शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी भारतीय कला केंद्रात शिकवण्यास प्रारंभ केला. पुढं जाऊन कथ्थक केंद्राची स्थापना झाली आणि बिरजू महाराज तिथं दाखल झाले. ते कथ्थक केंद्रात तासन्तास सराव करायचे. त्याठिकाणी अन्य शिक्षक देखील असायचे. ते देखील नृत्यशैलीत पारंगत होते. परंतु बिरजू महाराज यांची शैली ही अनोखी आणि विलक्षण प्रभावशाली हेाती. त्यांच्या नृत्यामागे एक विचार होता, गुणात्मकता होती आणि मोहक सौंदर्य होतं. कथ्थक केंद्रात त्यांनी तयार केलेले शिष्य हे कालांतराने उत्तम नृत्यकलाकार म्हणून नावारूपास आले.

मुंबईतील कॉलेजचे दिवस मी कसे विसरेन? बिरजू महाराज यांच्या दोन नृत्यनाटिका मी पाहिल्या. त्यात एक मालती माधव अणि दुसरी गीत गोविंदम. दोन्हींमध्ये महाराज हे नायक होते आणि कुमुदनी लाखिया नायिका. ती नृत्यनाटिका आजही माझ्या स्मरणात आहे. त्यांच्याकडे कलेची प्रतिभा ही असीम होती. त्यानंतर मी दिल्लीला परतले तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी सुरू झाल्या. मैत्री वाढतच गेली आणि ती कालांतराने द़ृढ झाली. आम्ही अनेक सायंकाळ एकाच व्यासपीठावर पण वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून एकत्र व्यतीत केल्या आहेत. मी वेगळ्या धाटणीची कलाकार आणि महाराज देखील वेगळ्या शैलीचे. त्यामुळे दोघांना एकत्रपणे कधीच कला सादर करता आली नाही. त्यावेळी जुगलबंदीचा काळ देखील नव्हता. त्यामुळे एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या सादरीकरणाच्या आठवणी माझ्या मनात कोरल्या गेल्या आहेत. र

ते दुसर्‍या कलाकारांचा कार्यक्रम देखील मोठ्या आवडीने आणि उत्साहाने पाहात असत. असा मोठेपणा क्वचितच अन्य कलांकारात पाहावयास मिळतो. विशेषतः लोकमान्यता लाभलेल्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या कलाकारांकडून कित्येकदा नवख्या कलाकारांच्या कार्यक्रमांचं निमंत्रणही स्वीकारलं जात नाही. अनेक कलाकार असे आहेत, जे आपला कार्यक्रम पूर्ण करतात आणि निघून जातात. परंतु पंडित बिरजू महाराज हे अंगावर शाल घेऊन तेथेच बस्तान मांडत असत. त्यांनी माझे अनेक कार्यक्रम असेच पाहिले आणि कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही चर्चा देखील केली आहे. माझ्या मते, पंडितजींच्या या गुणाचे अनुकरण कला क्षेत्रातील सर्वांनीच करायला हवं. ते अगदी मोकळ्या मनाचे आणि मनात सदैव स्नेहभाव असणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची शैली आपण कधीच विसरू शकत नाही. ते पान मसाल्याचे शौकिन होते. परंतु तो साधा पान मसाला असायचा. त्यात तंबाखू नसायची. जेव्हा आपण एकत्र बसायचो, तेव्हा मी तत्काळ हात पुढे करायचे. ते हसत म्हणत, मला कर तर द्यावाच लागेल. साहजिकच अशा अनेक लहानसहान आठवणींचे भांडार माझ्या मनात आहे. पण माझ्या द़ृष्टीने त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या आधारावरच मैत्री कशी असते, याचं आकलन करता येतं. पंडित बिरजू महाराज हे अशा मैत्रीचे आधारशीला होते.

Back to top button