विशाल फटे प्रकरण : नेट कॅफेतून विणले लुटीचे जाळे | पुढारी

विशाल फटे प्रकरण : नेट कॅफेतून विणले लुटीचे जाळे

सोलापूर ; गणेश गोडसे : बालपणापासून बोलण्यात पटाईत. इंग्रजीवर प्रभुत्व आणि समोरच्याच्या मनाचा अंदाज घेण्यात तरबेज असलेल्या विशाल फटे चे जीवन आर्थिकदृष्ट्या आणखी ‘विशाल’ करण्याचे नियोजन त्याच्या वडिलांनी केले. त्याला संगणक प्रशिक्षण केंद्र घालून दिले. मात्र, त्यात त्याचे मन रमले नाही. त्याने थेट बार्शीत येऊन नेट कॅफे सुरू केले. त्यातूनच आधी मित्र, नंतर नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांचा विश्‍वास संपादन करून लुटीचे चक्‍क जाळेच विणले. याला लोक बळी पडत गेले आणि त्याचा फसवेगिरीचा धंदा विशाल बनत गेला.

मुळात बार्शी तालुका कृषिप्रधान. शेतकर्‍यांसह नागरिकही सधन. विशाल फटेने सुरू केलेल्या नेट कॅफेत विविध कामांसाठी शेतकरी, नागरिक येत राहिले. कधी पीक विमा भरण्यासाठी, तर कधी कर्ज सवलत योजना, बँकेचे प्रकरण, सात-बारा, शेततळे, फळपीक योजनेसह अन्य कामांसाठी त्यांच्याकडे नागरिकांचा राबता राहिला.

आपुसकच याचा फायदा फटेला झाला. मुळात तो मनकवडा असल्याने समोरच्याचे त्याने अंतर्मन हेरलेे आणि आपल्या कमाईचा फंडा त्यांच्या मनावर बिंबवण्यास सुरुवात केली. याला भुलून लोक गुंतवणूक करण्यास पुढे सरसावले. पहिल्याच झटक्यात चक्‍क 70 हजार रुपयांवर त्यांनी महिन्याकाठी 30 हजारांचे उत्पन्न गुंतवणूकदारांच्या पुढ्यात सरकावले.

तो 25 ते 30 टक्के प्रति महिना लाभ देत असे. कोणालाही याची शंका आली नाही. पैसे गुंतवणारे फक्‍त उत्पन्नाबरोबरच त्याच्या फंड्यावरच फिदा होत राहिले. यामुळे त्याच्या नेट कॅफेतील हा धंदा सुसज्ज कार्यालयात आला. यामुळे लोकांचा विश्‍वास आणखीच दृढ झाला.

तेव्हा त्याच्या फसवणुकीच्या सीमा अगदी विस्तारल्या. आधी हजारांत गुंतवणूक करणारे लाखांवर पोहोचले. बहुतांशजणांनी जमीन, जुमला, सोने, गहाण ठेवले, बँकेतील ठेवी मोडल्या, जमिनी आणि घरेही विकली. कारण बँकेतील व्याजापेक्षा फटेचे व्याज फारच विशाल होते. यातूनच अनेकानेक कंपन्या सुरू केल्याचे तो भासवू लागला. पुण्यासह मुंबई, दिल्लीत कार्यालय असल्याचे तो सांगू लागला. चक्‍क पुण्यात वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये त्याचे कार्यालय असल्याचा जावईशोधही त्याने लावला. यामुळे लोक भुलत गेले आणि शेतकर्‍यांना तो लुटत राहिला.

विशालबाबत प्राध्यापक असलेल्या वडिलांनी स्वावलंबनाचा विचार करुन सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्याला करिअर आणि कमाईचा योग्य मार्ग दिला होता. मात्र विशालचे मन अशा किरकोळ गोष्टींत रमले नाही. त्याची स्वप्ने फारच मोठी होती. परिणामी, त्याने चक्‍क संगणक प्रशिक्षण केंद्रच बंद पाडले.

व्यवसायात आलेला आर्थिक फटक्याच्या ताणतणावातूनच त्याने थेट गोवा गाठले. तो गोव्यात अधी वेटर, नंतर मॅनेजर झालेला फटे पुन्हा बार्शीत आला आणि शिवाजी महाविद्यालयालगत एका कॉम्प्लेक्समध्ये कॅफे सुरू करुन हा उद्योग सुरु केला. त्या उद्योगातील विश्‍वासाने त्याच्या जीवनाच्या सीमा फार मोठ्या झाल्या. पण गुंतवणूकदारांना वेळेत परतावा न दिल्याने त्याचा विश्‍वास संपत गेला. त्याच्याविरोधात तक्रारींचा पाऊस सुरुच आहे. (क्रमश:)

शंकेला थाराच नाही

प्रत्येक महिन्याला ठरलेल्या तारखेला विशाल फटे गुंतवणूकदारांना परतावा द्यायचा. यात सुरुवातीला कधीच खंड पडला नाही. 25 ते 30 टक्के घसघशीत उत्पन्न मिळत असल्याने नागरिकांच्या मनातही याबाबत शंका निर्माण झाली नाही. त्याच्या या कौशल्याने लोक फसवणुकीत पुढे सरकावले. वडील प्राध्यापक असल्यानेही लोकांचा त्याच्यावरचा विश्‍वास अगदी दृढ होत गेला अन् शंकेला थाराच उरला नाही.

आधी बार्शी, नंतर राज्य, परराज्यांतही जाळे

फुकट पैसे कमावण्याच्या नादात तो हळूहळू शेअर बाजारात गुंतवणूक करू लागला. त्यामुळे त्याचा पैशाचा मोह वाढतच गेला. त्यामुळे तो लोकांच्या जास्त संपर्कात जाऊन मित्रसमूह वाढवत गेला. त्यातूनच त्याला शेअर बाजार कंपनीची संकल्पना डोक्यात आली. पैसे कमावण्याचा मोह कोणीच आवरू शकत नाही. सुरुवातीला त्याचा हा धंदा बार्शी शहरात सरू झाला. त्यानंतर तालुका, नंतर शेजारील गावे, तालुके कव्हर करत राज्य आणि परराज्यांतही जाळे पसरवले.

Back to top button