Amar Jawan Jyoti : अमर जवान ज्योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित होणार | पुढारी

Amar Jawan Jyoti : अमर जवान ज्योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित होणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : (Amar Jawan Jyoti  राजधानी दिल्लीतील इंडिया गेटची ओळख असलेली अमर जवान ज्योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर प्रज्वलित होणार आहे. शुक्रवारी २१ जानेवारी रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे प्रज्वलित केलेल्या ज्योतीमध्ये ती विलीन केली जाईल. लष्करी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, ज्याचे अध्यक्ष जॉइंट डिफेन्स स्टाफचे प्रमुख एअर मार्शल बलभद्र राधा कृष्ण असतील. या कार्यक्रमात अमर जवान ज्योती युद्धस्मारकावर प्रज्वलित करून विलीन करण्यात येणार आहे.

अमर जवान ज्योती कधी ठेवण्यात आली?

पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटीश सरकारने इंडिया गेट बांधले होते. यानंतर १९७२ मध्ये अमर जवान ज्योती येथे ठेवण्यात आली. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ ती प्रज्वलित करण्यात आली. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. (Amar Jawan Jyoti)

राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन

२५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. हे ४० एकर जागेवर उभारण्यात आले आहे. पंतप्रधानांनी युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले तेव्हा अमर जवान ज्योतीची मूळ ज्योत येथे प्रज्वलित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर १९७१ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध स्मारकात हलवण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये बांगलादेश युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली.

लष्कराचे काय म्हणणे आहे?

अमर जवान ज्योती हलवण्यामागील तर्क असा आहे की दोन ठिकाणी ज्योत (मशाल) ठेवणे खूप कठीण होत आहे. आता देशातील हुतात्म्यांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्यात आले आहे, तर अमर जवान ज्योतीवर वेगळी ज्योत का पेटवायची, असेही लष्कराच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व शहीदांची नावे राष्ट्रीय युद्ध स्मारकात आहेत, शहीदांचे कुटुंबीय येथे येतात. अशा परिस्थितीत अमर जवान ज्योती येथे हलवणे योग्य ठरेल.

राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला

अमर जवान ज्योती इंडिया गेटवरून हलवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

“आमच्या वीर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझणार आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे. काही लोकांना देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाही, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा प्रज्वलित करु!” अस ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

सरकारने स्पष्टीकरण दिले

राहुल गांधींनी टीका केल्यानंतर अमर जवान ज्योती हलवण्याबाबत केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अमर जवान ज्योतीबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही ज्योत विझवली जात नसून ती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन केली जात आहे. असेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. (Amar Jawan Jyoti)

हेही वाचलत का?

Back to top button