मुंबई : मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका वर्षअखेरीस | पुढारी

मुंबई : मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका वर्षअखेरीस

मुंबई ; सुरेखा चोपडे : देशाच्या गतीमान विकासासाठी डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉरची निर्मिती केली जात आहे. मालवाहतूकीसाठी स्वतंत्र मार्गिका म्हणजेच पश्चिम डेडिकेटेड फे्रट कॉरिडॉर (डीएफसी ) बांधण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई ते दिल्ली मेल व एक्सप्रेस गाड्यांचाही प्रवास वेगवान होणार असून वेळेत बचत होणार आहे.

या मार्गातील जेएनपीटी ते वैतरणा या 102 कि.मी.च्या उत्तर दिशेकडील 320 मीटरच्या बोगद्याचे काम विरार येथे पारंपारिक पद्धतीने 200 किलो स्फोटकांद्वारे स्फोट घडवून डिसेंबर महिन्यात पुर्ण करण्यात आले आहे. पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. या मार्गातील 99 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.

पूर्व डीएफसीचा प्रकल्प लुधियाना ते पश्चिम बंगालमधील दानकुनी 1,760 कि.मी. आहे. तर पश्चिम डीएफसी जेएनपीटी ते उत्तर प्रदेशातील दादरीपर्यंत 1,504 कि.मी. अंतराचा आहे. जेनएनपीटी ते वैतरणा या 102 कि.मी.च्या मालगाडी मार्गाचे काम सध्या सुरू असून जून महिन्यात वसईत 340 मीटरचा बोगदा खणण्यात आला.

23 डिसेंबर रोजी विरार येथे 320 मीटरच्या बोगद्याचे द्वार स्फोटकांचा स्फोट घडवून पाडण्यात आले.हा कॉरीडॉर पूर्ण झाल्यानंतर मालगाड्या डीएफसी मार्गावर चालविल्याने उड्डाण पुल आणि रेल्वे खालील पुलांच्या उभारणीमुळे सर्व रेल्वे फाटके बंद करणे शक्य होईल . त्यामुळे मुंबई ते दिल्ली पॅसेंजर ट्रेनचा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर

पश्चिम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे मुंबई-दिल्ली मार्गावर अतिरिक्त प्रवासी गाड्या चालवण्यासाठी सध्याचे ट्रॅक मोकळे होणार आहे. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पासाठी 99 टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्याशिवाय, मुंबई विभागातील तीन हजार 215 प्रकल्पग्रस्त कुटुंबापैकी दोन हजार 292 कुटुंबाचे पुनर्वसनाचे काम झाले आहे.तर 923 जणांचे शिल्लक आहे. या वर्षभरात दादरीला जेएनपीटीशी जोडण्यात येणार आहे.

मालवाहतुकीवर भर

भारतीय रेल्वेने मालवाहतुकीवर विशेष भर दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात (वर्ष 2021-11) नागपूरमार्गे ईटारसी ते विजयवाडा दरम्यान डेडिकेटेड फ्रेट कॉरीडॉरची घोषणा करण्यात आली आहे. मालवाहतुकीसाठी समर्पित असणार्‍या या मार्गामुळे देशांतर्गेत मालवाहतुकीला वेग आणि चालना मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे शेतकरी,उद्योजक व्यापार्‍यांना फायदा होण्यासेाबतच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीचीही शक्यता आहे.नागपूरमार्गे जाणार्‍या प्रकल्पाला उत्तर-दक्षिण फ्रेट कॉरीडॉर नावे दिले आहे.एकुण 957 किमी लांबीच्या या मार्गापैकी अध्याहून अधिक म्हणजेच तब्बल 508 किमी मार्ग मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून जाणार आहे.

डबल डेकर मालगाडी धावणार

‘ब्रेक थ्रू’ करण्यात आलेला विरार येथील 11 मीटर उंचीचा देशातील पहिलाच बोगदा आहे. त्यातून एकावर एक अशा डबल कंटेनरची इलेक्ट्रिक मालगाडी धावणार आहे. या मालगाड्यांचा वेगही दुप्पट म्हणजे दर ताशी 80 कि.मी.पेक्षा जास्त असेल.या मार्गावर एकूण 750 मीटर लांबीचे दोन बोगदे आहेत. या मार्गावर 25 मोठे तर 194 छोटे पुल आहेत.

Back to top button