महाराष्ट्राने जन सामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला : जयंत पाटील | पुढारी

महाराष्ट्राने जन सामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला : जयंत पाटील

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते व विचारवंत प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली आहे.

मंत्री जयंत पाटील यांन ट्विट करुन आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्रातील ऋषितुल्य असे व्यक्तिमत्व, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र सरकार मधील माजी मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. ते अखेरपर्यंत राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले.

महाराष्ट्राच्या विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारेशी कटिबद्ध राहिले.

संबंधित बातम्या

माझे त्यांच्याशी अत्यंत कौटुंबिक असे संबंध होते. मा. प्रा. एन. डी. पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्राने जन सामान्यांसाठी लढणारा एक योद्धा कायमचा गमावला आहे. अस ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास

नारायण ज्ञानदेव पाटील (N. D. Patil) यांचा जन्म १५ जुलै १९२९ साली सांगली जिल्ह्यातील ढवळी (नागाव) येथील अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी १९५५ साली अर्थशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं होते.

साताऱ्यातील १९५४ – १९५७ दरम्यान छत्रपती शिवाजी कॉलेज येथे प्राध्यापक आणि ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख देखील होते. इस्लामपूर येथील १९६० साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता. र १९६२ साली पुणे विद्यापीठातूनच वकिलीचं शिक्षणही पूर्ण केले.

एन. डी. पाटील यांनी  १९४८ मध्‍ये शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला होता. १९५७ मध्ये मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस राहिले. १९६०-६६, १९७०-७६, १९७६-८२ अशी १८ वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य भूषविले. शेतकरी कामगार पक्षाचे १९६९- १९७८, १९८५-२०१० सरचिटणीस राहिले.

१९५९ पासून रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य होते. शिवाजी विद्यापीठात एन. डी. पाटील (N. D. Patil) हे पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य (१९६२), सिनेट सदस्य (१९६५), कार्यकारिणी सदस्य (१९६२-१९७८), सामाजिकशास्त्र विभागाचे डीन (१९७६-१९७८) ही ते हाेते. १९८५ पासून बेळगावमधील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष होते. १९९० पासून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते.  १९९१ साली महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण आयोगाचे सदस्य म्‍हणून त्‍यांनी काम पाहिले.

१९७८-१९८० मध्ये राज्याचे सहकारमंत्री होते. १९८५-१९९० साली महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघ) राहिले. १९९९-२००२ मध्ये लोकशाही आघाडी सरकार निमंत्रक होते. महाराष्ट्र राज्य सीमाप्रश्न समितीचे सदस्य व सीमा चळवळीचे प्रमुख नेते म्हणूनही एन. डी. पाटील राज्यात ओळखले जात होते.

एन. डी. पाटील यांना भाई माधवराव बागल पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते. नांदेडमधील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाने १९९९ साली डी.लीट.पदवी देऊन गौरविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानेदेखील २००२ साली डी.लीट देऊन गौरविले हाेते.

१९९८-२००० साली भारत सरकारच्या राष्ट्रीय बियाणे महामंडळ अध्यक्षपद,  तसेच २००१ साली परभणी येथे भरलेले विचारवेध संमेलनाचे अध्यक्षपद एन. डी. पाटील यांनी भूषविले. शिवाजी विद्यापीठाकडूनही त्यांना डी. लीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्याचबरोबर शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचलत का?

Back to top button