सोलापूर : श्री सिद्धेश्वर यांचा अक्षता सोहळा उत्साहात | पुढारी

सोलापूर : श्री सिद्धेश्वर यांचा अक्षता सोहळा उत्साहात

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘हर हर बोला हर…’च्या गजरात योग दंडाच्या साक्षीने गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजता श्री सिद्धेश्वर यांचा अक्षता सोहळा उत्साहात पार पडला. कोरोनाच्या निर्बंधामुळे परंपरेनुसार होणार्‍या गड्डा यात्रेवर यावर्षीही निर्बंध आले; पण मानकरी व निवडक पासधारक भक्तांच्या उपस्थितीत भाविकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. यावेळी संपूर्ण परिसरात मानकरी, पंच, पासधारक व पोलिस अशा हजारभरांचीच उपस्थिती होती.

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या हातातील योगदंडाची कुंभार कन्याशी बाराव्या शतकांमध्ये विवाह झाल्याची आख्यायिका आहे. त्याच श्रद्धेने सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीकात्मक अक्षता सोहळ्याची परंपरा सुरू आहे.

परंतु, कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रेवर कडक निर्बंध असल्याने कोरोनाचे नियम पाळून यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्याअंतर्गत आज सिद्धेश्वर यात्रेत अक्षता सोहळा होता. यामुळे दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार्‍या अक्षता सोहळ्याला सलग दुसर्‍या वर्षीही केवळ हजारपेक्षा कमी भाविक उपस्थित होते.

प्रारंभी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाळी वेस येथील हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या व दुसर्‍या नंदीध्वजास मानकरी देशमुख, हिरेहब्बू यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. यावेळी काशी पीठाचे उतराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, खासदार जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी उपस्थित होते.

योगदंड, श्रीं सिध्देश्वर महाराज यांची पालखी, मानकरी यांचा सकाळी पावणे अकराच्या सूमारास सिद्धेश्वर मंदिर परिसरात संमती कट्ट्याजवळ आगमन झाल्यानंतर अक्षता सोहळ्यातील विधींना प्रारंभ झाला. दरवर्षी अक्षता सोहळ्याला कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील लाखो भाविकांची उपस्थिती असते. परंतु कोरोनाच्या सावटामुळे प्रशासनाने केवळ पन्नास जणांनाच अक्षता सोहळ्यासाठी परवानगी दिली होती.

दर वर्षी अक्षता सोहळ्यास दुपारी दोन ते साडेतीन दरम्यानची वेळ येत होती. कोरोना परिस्थितीमुळे निबर्र्धात अक्षता सोहळा होत असल्याने सलग दुसर्‍या वर्षीही साडे अकरा वाजता अक्षता सोहळा उत्साहात झाला.

या अक्षता सोहळ्यासाठी खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी,मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, चिदानंद वनोरोटे, विश्वनाथ चाकोते, सिद्धाराम चाकोते, माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्यासह देवस्थानचे ट्रस्टी व मानकरी उपस्थित होते.

पुढच्या वर्षी कोरोनामुक्त व्हावी : हिरेहब्बू
हिरेहब्बू म्हणाले, सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा देशभरात गड्डायात्रा म्हणून वर्षानुवर्षे प्रसिद्ध आहे. यात्रेला लाखो भाविकांची उपस्थिती असते; पण कोरोना परिस्थितीमुळे सलग दुसर्‍या वर्षी कमी मानकर्‍यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडत आहेत. यात्रा सिद्धरामेश्वरांनी घालून दिलेल्या रूढी, प्रथा, परंपरेनुसार त्यांच्या विचारांवर होते. पुढच्या वर्षी कोरोनामुक्ती होऊन यात्रा लाखोंच्या उपस्थितीत व्हावी, अशी अपेक्षा आहे.

Back to top button