कोल्हापूर : जिल्ह्याचा 640 कोटींचा प्रारूप आराखडा | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्याचा 640 कोटींचा प्रारूप आराखडा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा वार्षिक योजनेच्या 2022-23 साठी 521 कोटी 99 लाख रुपयांच्या आराखड्यासह अनुसूचित जाती उपयोजना आणि ओ.टी.एस.पी. योजनेंतर्गत जिल्ह्याच्या एकूण 640 कोटी 20 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता दिल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने ही सभा झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्य शासनाने 2022-23 साठी 321 कोटी 99 लाख रुपयांची वित्तीय मर्यादा दिली आहे. या मर्यादेसह शासनाकडे 200 कोटी रुपयांच्या अतिरिक्‍त निधीची मागणी केली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 116 कोटी 60 लाख रुपयांचा तर ओ.टी.एस.पी. योजनेंतर्गत 1 कोटी 61 लाख असा एकूण 640 कोटी 20 लाख रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील वर्षासाठी 11 कोटी 27 लाख नावीन्यपूर्ण योजनांसाठी

वित्तीय मर्यादेनुसार जिल्हा वार्षिक योजनेचा 321 कोटी 99 लाखांचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये गाभा क्षेत्रासाठी 197 कोटी 49 लाखांची, बिगर गाभा क्षेत्रासाठी 98 कोटी 74 लाखांची, नावीन्यपूर्ण योजनांसाठी 11 कोटी 27 लाखांची, सूक्ष्म प्रकल्पासाठी 3 कोटी 22 लाखांची, महिला व बालकल्याणकरिता 9 कोटी 66 लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याचा 640 कोटींचा प्रारूप आराखडा
कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलताना पालकमंत्री सतेज पाटील. यावेळी उपस्थित ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जि. प. अध्यक्ष राहुल पाटील, खा. धैर्यशील माने, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजू आवळे आदी.

200 कोटी अतिरिक्‍त निधीची मागणी

अतिरिक्‍त 200 कोटी रुपयांच्या निधीतून साकव, इतर जिल्हा रस्ते व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास, पूर नियंत्रण, नगरोत्थान, शासकीय कार्यालयीन इमारती, रुग्णालये बांधकाम, पोलिस यंत्रणा पायाभूत सुविधा, क्रीडा विभागाकडील योजना आदी कामे केली जाणार आहेत. राज्यस्तरीय समितीची बैठक दि.21 जानेवारीला उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीत अतिरिक्‍त मागणीसह जिल्हा वार्षिक योजनेचा 522 कोटी रुपयांचा आराखडा सादर केला जाईल.

तीन यात्रास्थळांना ‘क’ वर्ग दर्जा

तासगाव (ता. हातकणंगले) येेथील महादेव मंदिर, खेबवडे (ता. करवीर) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर व ऐनापूर (गडहिंग्लज) येथील गणेश मंदिर या यात्रास्थळांना ‘क’ वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली.

डिसेंबरअखेर 25 टक्के खर्च

जिल्ह्याच्या 2021-22 चा जिल्हा वार्षिक योजनेचा 375 कोटींचा आराखडा होता. राज्य शासनाकडून हा सर्व निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी 72 कोटी निधी कोरोनासाठी खर्च केला जाणार आहे. प्राप्‍त निधीपैकी डिसेंबरअखेर 60 कोटी 83 लाखांचा निधी खर्च झाला असून 215 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 116 कोटी 60 लाखांचा आराखडा आहे. त्यापैकी डिसेंबरअखेर 66 कोटी 41 लाख रुपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित खर्चाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ओ.टी.एस.पी.चा 1 कोटी 61 लाखांचा निधी अद्याप खर्च झालेला नाही. मार्चअखेर सर्व निधी खर्च होईल, तशा सूचना दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प व अपुरी कामे जलद पूर्ण करावीत, अशा सूचना देऊन शासन स्तरावर प्रलंबित विषयांबाबत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेऊ, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.चंदगड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या द‍ृष्टीने आणखी एका पोलिस स्टेशनची स्थापना करण्याची मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. त्यावर प्रस्ताव सादर करा. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. वन विभागाच्या परवानगीसाठी प्रलंबित असणार्‍या विविध विभागांच्या अडचणी दर महिन्याच्या शेवटच्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. पन्हाळा रस्ता कधी होणार, अशी विचारणा खा. धैर्यशील माने यांनी केली. जिल्ह्यातील रस्ता दुरुस्तीची प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.

रस्त्याबाबत प्रसंगी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याबरोबर बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महानगरपालिका आयुक्‍त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विशाल लोंढे आदी प्रत्यक्ष तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आ. पी. एन. पाटील यांचा रुद्रावतार

परिते-गारगोटी मार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याबद्दल बैठकीत आमदार पी. एन. पाटील यांनी रुद्रावतार धारण केला. या मार्गाचे काम गेली दोन-तीन वर्षे रखडले आहे. याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या कामाचा ठेकेदार बदलावा व काम जलदगतीने पूर्ण करावे, अशी मागणी आपण लावून धरली आहे. मात्र, सार्वजनिक बांधकामच्या काही अधिकार्‍यांनी याबाबत बेफिकिरी दाखवत आहेत. मुख्य ठेकेदार बदलण्याऐवजी दोन उपठेकेदार नेमण्याचा प्रयत्न केल्याचे आ. पाटील यांनी सांगत अधिकार्‍यांना धारेवर धरले. निविदेनुसार काम करण्याची मुदत संपूनही संबंधित ठेकेदाराला अधिकारी अभय देत आहेत. ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई का करत नाहीत, अशी संतप्‍त विचारणाही त्यांनी केली.संबंधित अधिकार्‍यांनी आठ दिवसांत कार्यवाही न केल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

‘सायटेक सेंटर’, ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ साकारणार
नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत विद्यामंदिर यादववाडी (ता. करवीर) येथे स्मार्ट टू ग्लोबल स्कूल साकारणार आहे. याखेरीज कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी संपादित केल्या जाणार्‍या जमिनीतील उच्च दाब विद्युत वाहिनी स्थलांतर करण्यासाठीही नावीन्यपूर्ण योजनेतून निधी दिला जाणार आहे. यासह अत्याधुनिक सायटेक सेंटर उभारण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून निधी देण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ : जय भीम चित्रपटातल्या गाण्याचं हे मराठी कव्हर सॉंग जरूर ऐका | Cover Song of Jai Bhim | Jay bhim movie

Back to top button