COVID-19 Vaccination : कर्नाटकात सगळेच लसवंत, पहिल्या डोसची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणारे बनले पहिले राज्य

COVID-19 Vaccination : कर्नाटकात सगळेच लसवंत, पहिल्या डोसची १०० टक्के उद्दिष्टपूर्ती करणारे बनले पहिले राज्य
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकात कोरोनाचा पहिला डोस (COVID-19 Vaccination) देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे. ही कामगिरी करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. दुसरा डोसही 85 टक्के लोकांना देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी रविवारी ही माहिती दिली. 18 वर्षांवरील सुमारे 4 कोटी लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

पत्रकारांशी बोलताना डॉ. सुधाकर म्हणाले, कोरोना लसीकरणामध्ये इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटक आघाडीवर आहे. आरोग्य कर्मचारी, इतर कोरोना योद्धे, डॉक्टरांमुळे राज्यामध्ये पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह सर्व खात्यांतील अधिकार्‍यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या व संसर्ग प्रमाण घटत आहे. आतापर्यंत कर्नाटकात एकूण 6 कोटी कोरोना चाचण्या केल्या आहेत. संपूर्ण देशात या बाबतीत कर्नाटक तिसर्‍या स्थानावर आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. तज्ज्ञांनी आगामी 2 ते 3 आठवड्यांत कर्नाटकात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जनतेने सहकार्य केल्यास लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा विश्वास डॉ. सुधाकर यांनी व्यक्त केला.

बंगळूरमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 24.25 टक्के होते. आता हे प्रमाण 17 ते 19 टक्क्यांवर आले आहे. आगामी काळात हे प्रमाण आणखी कमी होईल. सरकार आणि जनतेसाठी हे दिलासादायक आहे. 19 जानेवारी रोजी सर्वाधिक संसर्ग प्रमाण होते. आता हे प्रमाण कमी होत आहे. इतर जिल्ह्यांमध्येही संसर्ग कमी होत आहे.

कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या सध्या कमी आहे. पण, ही संख्या वाढल्यास अनिवार्यपणे कठोर निर्बंध लागू करावे लागतील. सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, म्हणून वीकेंड कर्फ्यू मागे घेतला आहे. जनतेने कोरोना मार्गसूचीचे पालन करावे. केवळ कठोर नियम लागू करून उपयोग नाही. सर्वांनी स्वेच्छेने काटेकोरपणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेपेक्षा तिसरी लाट वेगळी आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी लक्षणे तीव्र नाहीत. आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसत नसल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

COVID-19 Vaccination : 1 वर्ष 7 दिवसांनी पहिला डोस 100 टक्के पूर्ण

कोरोना लसीकरण मोहीम सुरू केल्यानंतर 1 वर्ष 7 दिवसांनी पहिला डोस 100 टक्के पूर्ण झाला. लसीकरण पूर्ण करणारे कर्नाटक हे देशातील पहिलेच राज्य आहे. सुमारे 4 कोटी प्रौढांचे लसीकरण या मोहिमेत करण्यात आले.

दिवसभरात 50 हजार रुग्ण

कर्नाटकातील कोरोना रुग्णसंख्येने 50 हजारांचा टप्पा गाठला आहे. रविवारी 50,210 रुग्ण आढळले. त्यापैकी 26,299 रुग्ण बंगळुरात आहेत. राज्यातील संसर्गाचे प्रमाण 22.77 टक्के आहे. सक्रिय रुग्णसंख्या 3,57,796 वर पोहोचली आहे. ओमायक्रॉनचे 165 रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या 931 वर गेली आहे.

कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या सध्या कमी आहे. पण, ही संख्या वाढल्यास अनिवार्यपणे कठोर निर्बंध लागू करावे लागतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ९७ वर्षांचे आबा घुमवत्यात दांडपट्टा | 97 year's Kolhapur man excels traditional martial art

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news