Iran Israel war | इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सहाव्या दिवशीही अधिक तीव्र झाला असून, इराणने तेल अवीववर हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 'बिनशर्त शरणागती' पत्करण्याची मागणी केली आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने किमान ३० लष्करी विमाने युरोपकडे रवाना केल्याचे वृत्त आहे, तर इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर 'कोणतीही दया न दाखवण्याची' भूमिका घेतली आहे.
इराण आणि इस्रायलमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक भीषण होत आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बुधवारी दावा केला की, इस्रायलची राजधानी तेल अवीववर केलेल्या हल्ल्यात हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. या हल्ल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, इस्रायली हवाई दलानेही आपण शांत बसलेलो नसून, तेहरानमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांमधील ही लढाई आता सहाव्या दिवशी सुरू आहे.
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी इराणला बिनशर्त शरणागती पत्करण्यास सांगितले आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांनी बिनशर्त शरणागती, असे लिहिले आहे. ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांनाही लक्ष्य केले. ते म्हणाले, "तथाकथित सर्वोच्च नेते कुठे लपले आहेत, हे आम्हाला नक्की माहीत आहे. ते एक सोपे लक्ष्य आहेत, पण सध्या ते सुरक्षित आहेत. आम्ही त्यांना लगेच मारणार नाही, पण आमचा संयम सुटत चालला आहे. क्षेपणास्त्रांनी निष्पाप नागरिकांवर होणारे हल्ले आणि अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करणे खपवून घेतले जाणार नाही."
दरम्यान, दरम्यान, बीबीसीच्या फ्लाईट ट्रॅकिंग रिपोर्टनुसार, गेल्या तीन दिवसांत अमेरिकेच्या तळांवरून किमान ३० अमेरिकन लष्करी विमाने युरोपकडे रवाना झाली आहेत. ही सर्व विमाने अमेरिकेची लष्करी टँकर विमाने असल्याचे समजते, ज्यांचा उपयोग लढाऊ विमाने आणि बॉम्बर विमानांना हवेतच इंधन भरण्यासाठी केला जातो. या हालचालींमुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने सरकारी टेलिव्हिजनवर निवेदन जारी करून 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-३' च्या ११ व्या लाटेत यशस्वीरित्या विध्वंसक हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात फतह-१ हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा वापर करून इस्रायलला लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर, इराणी सैन्याने इस्रायलच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांवरील हवाई क्षेत्रावर पूर्ण नियंत्रण मिळवल्याचा दावाही रिव्होल्युशनरी गार्डने केला आहे.