पुढारी ऑनलाईन डेस्क : ताब्यातील पश्चिम किनारा प्रदेशात (वेस्ट बँक) इस्रायली लष्कराने केलेल्या हल्ल्यात नऊ पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, असा दावा पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी केल्याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. दहशतवादी संघटना हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्त्रालयवर केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील रक्तरंजित संघर्ष कायम राहिला आहे.
जेनिन शहराचे गव्हर्नर कमल अबू अल-रुब यांनी पॅलेस्टिनी रेडिओवर बोलताना सांगितले की, इस्रायली सैन्याने जेनिन शहराला वेढा घातला आहे. शहरातील प्रवेशाचे ठिकाण आणि रुग्णालयांमधील प्रवेश रोखला आहे. तसेच निवारा छावणीतील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या आहेत. इस्रायली सैन्यासोबत हमासची चकमक सुरु आहे. दरम्यान, पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बुधवारी पहाटे सात जणांचा मृत्यू झाला, तुबास, दुसरे वेस्ट बँक शहर आणि जेनिनमध्ये आणखी दोघांचा गोळीबारात ठार झाले आहेत.
यापूर्वी इस्रायली सैन्याने स्पष्ट केले होते की, जेनिन आणि तुलकरेम या पश्चिम किनारा प्रदेशातील (वेस्ट बँक) शहरांमध्ये कार्यरत होते; येथे केलेल्या कारवाईचा तपशील प्रदान केलेला नाही. गाझामधील युद्ध 10 महिन्यांपूर्वी सुरू झाल्यापासून वेस्ट बँकमधील 600 हून अधिक पॅलेस्टिनी इस्रायली गोळीबारात ठार झाले आहेत.हमास आणि इतर अतिरेकी गटांना उद्ध्वस्त करण्यासाठी आणि इस्रायलींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे इस्रायलचे म्हणणे आहे.
इस्रायलने १९६७ च्या मध्यपूर्व युद्धात वेस्ट बँक, गाझा आणि पूर्व जेरुसलेम ताब्यात घेतले. इस्रायलने वेस्ट बँक ओलांडून अनेक वस्त्या बांधल्या आहेत, यामध्ये सुमारे पाच लाख ज्यू धर्माचे नागरिक स्थायिक आहेत. वेस्ट बँकमधील 3 दशलक्ष पॅलेस्टिनी इस्रायली लष्करी राजवटीत राहतात.