पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकन स्पेस एजन्सी नासा भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर पाठवणार आहे. इस्रोने शुक्रवारी(दि.2) एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. इस्त्रोच्या ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटरने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमधील आगामी मिशनसाठी अमेरिकेशी करार केला आहे. ज्यामध्ये दोन भारतीय प्राइम आणि बॅकअप मिशन पायलट असतील. ईस्त्रोने दिलेल्या निवेदनानुसार, ग्रुप कॅप्टन शुक्ला हे प्राथमिक मिशन पायलट असतील, तर भारतीय हवाई दलाचे दुसरे अधिकारी, ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर हे बॅकअप मिशन पायलट असतील. दोन्ही अधिकाऱ्यांना 'गगनयात्री' म्हणूनही ओळखले जाते. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात त्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.
गतवर्षी, हवाई दलातून चार चाचणी वैमानिकांची निवड करण्यात आली होती आणि गगनयान मोहिमेसाठी बंगळुरूमधील इस्रोच्या अंतराळवीर प्रशिक्षण केंद्रात त्यांचे प्राथमिक प्रशिक्षण सुरू झाले होते. गगनयान मोहीम हा भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण क्षमतेचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. तीन दिवसांच्या मोहिमेसाठी 3 ते 400 किमीच्या कक्षेत तीन क्रू पाठवण्याची मिशनची योजना आहे, ज्यामुळे पृथ्वीवर सुरक्षित परत येईल.
लखनौमध्ये जन्मलेले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांचा भारतीय हवाई दलातील प्रवास सुमारे १८ वर्षांपूर्वी सुरू झाला. कठोर आणि दीर्घ लष्करी प्रशिक्षणासाठी त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रवेश केला. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांच्या मोठ्या बहिणीने सांगितले, कारगिल दरम्यान भारतीय जवानांच्या शौर्य आणि बलिदानाच्या वीरगाथा वाचून त्यांना सशस्त्र दलात सामील होण्याची प्रेरणा मिळाली होती.