

Paris Louvre Museum Jewel Heist
पॅरिस: मोनालिसासह जगातील काही प्रतिष्ठित ऐतिहासिक कलाकृती असलेले पॅरिसमधील जगप्रसिद्ध लूव्र (Louvre) वस्तुसंग्रहालयातून झालेल्या हाय-प्रोफाइल हिरे चोरी प्रकरणी फ्रेंच पोलिसांनी शनिवारी (दि. २५) दोन संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या या दोघांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप त्यांची ओळख उघड केलेली नाही, असे वृत्त 'असोसिएटेड प्रेस'ने दिले आहे.
फ्रेंच वृत्तपत्र 'ले पॅरिसियन' (Le Parisien) नुसार, एका संशयिताला रात्री १० वाजण्याच्या सुमारास चार्ल्स डी गॉल विमानतळावर देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक करण्यात आली, तर दुसऱ्या संशयिताला त्यानंतर पॅरिसच्या उत्तरेकडील सेन-सेंट-डेनिस (Seine-Saint-Denis) उपनगरातून पकडण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, हे दोन्ही पुरुष अंदाजे ३० वर्षांचे असून, ते चोरीचा कट रचणाऱ्या टोळीचा भाग असल्याचा संशय आहे. या टोळीने अवघ्या सात मिनिटांत सुमारे १०२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ८४० कोटींहून अधिक रुपये) किमतीचे दागिने चोरले होते.
पोलिसांनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, चोरट्यांनी चोरीसाठी चोरलेला एका ट्रकमधील सरकता जिना वापरून वस्तुसंग्रहालयाच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीत प्रवेश केला. चोरट्यांनी एका बास्केट लिफ्टचा वापर करून इमारतीच्या 'सेन' नदीकडील बाजूने वर चढून एक खिडकी तोडली. त्यानंतर दोन शोकेस फोडले आणि काही मिनिटांतच दुचाकीवरून (मोटारसायकल) पळ काढला.पळून जात असताना चोरट्यांच्या हातून हिऱ्यांनी व पाचूंनी जडवलेला एक मुकुट (crown) खाली पडला. मात्र, त्यांनी आठ मौल्यवान वस्तू घेवून पोबारा केला होता. या वस्तूंमध्ये नेपोलियन बोनापार्टने त्याची पत्नी सम्राज्ञी मेरी-लुईस (हिला दिलेला पाचू आणि हिऱ्यांचा हार देखील समावेश आहे. चोरी होताच धोक्याची घंटा (अलार्म) वाजली आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी धावले, पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या फिल्मी स्टाईल चोरीकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले असून, आता चोरट्यांकडून मौल्यवान दागिने परत मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१९११ मध्ये झाली होती मोनलिसा चित्राची चोरी
जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालयातून चोरी आणि दरोड्याच्या प्रयत्नांचा मोठा इतिहास आहे. १९११ मध्ये मोना लिसा चित्राची चौकटीतून गायब झाली. विन्सेंझो पेरुगिया म्हणून ओळखला जाणारा चोर संग्रहालयात लपला आणि त्याच्या कोटाखाली पेंटिंग घेऊन बाहेर पडला. या चित्राचाच शोध अखेर दोन वर्षांनंतर फ्लोरेन्समध्ये संपला. अखेर लिओनार्डो दा विंचीचे मोना लिसाचे पोर्ट्रेट जगातील सर्वात प्रसिद्ध कलाकृती बनले. लूव्र संग्रहालयात १९८३ मध्ये झालेली चोरी जगप्रसिद्ध झाली होती. संग्रहालयातील दोन चिलखत चोरीला गेले होते. तब्बल ४० वर्षांनंतर हे चिलखत जप्त करण्यात आले.
जगप्रसिद्ध लूव्र संग्रहालय हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे. येथे दिवसाला ३० हजारांहून अधिक लोक भेट देतात. या संग्रहालय अनेक खास आणि मौल्यवान (३३,००० हून अधिक) पुरातन वस्तू, शिल्पे, चित्रे आहेत.मेसोपोटेमिया, इजिप्त आणि नेपोलियन काळातील वस्तू येथे आहे.