

Indian woman raped UK
वालसॉल : युनायटेड किंगडमच्या वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. वेस्ट मिडलँड्स पोलिसांनी या हल्ल्याला 'वांशिक प्रेरित' म्हटले असून, आरोपीने हा गुन्हा मुलीची जात किंवा वंश पाहून केला असल्याचे स्पष्ट केले आहे.
काय घडले?
शनिवारी रात्री उशिरा वालसॉल येथील पार्क हॉल परिसरात ही घटना उघडकीस आली. तरूणी लैंगिक अत्याचारानंतर रस्त्याच्या मधोमध घाबरलेल्या अवस्थेत बसली होती. याबाबत माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास करत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी रोनन टायरेर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. "एका तरुणीवर झालेला हा अत्यंत भयानक हल्ला आहे आणि आम्ही दोषीला तात्काळ अटक करण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहोत," असे त्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा फोटो जारी
पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा फोटो जारी केला आहे. हल्लेखोराची लवकरात लवकर ओळख पटवून त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. टायरेर पुढे म्हणाले, "आम्ही पुरावे गोळा करत आहोत आणि हल्लेखोराचे प्रोफाइल तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या अनेक मार्गांनी तपास सुरू असला तरी, नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे."
नागरिकांना मदतीचे आवाहन
पोलिसांनी स्थानिक रहिवाशांना आणि वाहन चालकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. "ज्यांनी कोणी त्या वेळी पार्क हॉल परिसरात कोणत्याही पुरुषाला संशयास्पद पाहिले असेल, त्यांनी आम्हाला संपर्क साधावा," असे आवाहन टायरेर यांनी केले आहे. "तुमच्या गाडीतील डॅश कॅम फुटेज किंवा तुमच्याकडील कोणतेही सीसीटीव्ही फुटेज तपासामध्ये निर्णायक ठरू शकते. तुमची माहिती आम्हाला या प्रकरणाचा महत्त्वाचा छडा लावण्यासाठी मदत करेल," असेही त्यांनी स्पष्ट केले.