पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशाने पुन्हा एखदा भारतासोबतची Fish Diplomacy पुनर्स्थापित केली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने बंगलादेशातून भारतात २४२० टन हिलासा मासे पाठवले जाणार आहेत. खास चवीमुळे या माशांना पश्चिम बंगालमध्ये मोठी मागणी असते. या माशांच्या निर्यातीवर बांगलादेशाने घातलेली बंदी आता उठवण्यात आली आहे.
नवरात्रीच्या काळात बांगलादेशातून हे मासे पश्चिम बंगालमध्ये पाठवले जाण्याची प्रथा गेली काही वर्षं सुरू आहे. याला Hilsa Fish Diplomacy असे नाव दिले गेले होते, आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांनी भारतासाठी या माशाच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती.
हसिना यांनी तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू आणि आताच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना हे मासे भेट म्हणून पाठवले होते. २०२३मध्ये बांगलादेशाने ३९५० टन मासे भारतात पाठवले होते. पण शेख हसिना पदावरून पायउतार झाल्यानंतर बांगलादेशाने हा माशांच्या निर्यातीवर बंदी घातली. स्थानिक मागणी पूर्ण करण्यासाठी ही बंदी घातल्याचे सरकारचे मत होते.
पण आता बांगलादेशाने निर्यातबंदीचा हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे २१ सप्टेंबरपासून या माशांची भारतात आवक सुरू झालेली आहे.
वेस्ट बेंगाल फिश इंपोर्टस असोसिएशनचे सचिव सय्यद अन्वर मक्सूद म्हणाले, "बांगलादेशातून भारतात या माशांची निर्यात पूर्ववत व्हावी, यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला होता. सुरुवातीला बांगलादेशाने आमची मागणी फेटाळली होती. पण आता ही मागणी मान्य करण्यात आलेली आहे."