पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि आता अध्यक्षपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जुलैनंतर पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. रविवारी फ्लोरिडाच्या वेस्ट पाम बीच येथील त्यांच्या गोल्फ कोर्समध्ये गोल्फ खेळत असताना AK-47 रायफलने गोळीबार झाला. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून ट्रम्प यांनी सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
या घटनेच्या तपासाची जबाबदारी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) कडे सोपवण्यात आली आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार रविवारी पहाटे २ वाजण्याच्या आधी घडली. ट्रम्प यांच्यावरच कथित गोळीबार करण्यात आला होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांनीही या संदर्भात चौकशी सुरू केली आहे.
गोळीबार झालेल्या ठिकाणच्या झुडपात एक AK-47 रायफल सापडली असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. ही घटना घडली तेव्हा ट्रम्प क्लबमध्ये गोल्फ खेळत होते. घटनेनंतर सीक्रेट सर्व्हिस एजंट त्यांना क्लबच्या एका होल्डिंग रूममध्ये घेऊन गेले. दरम्यान, या हल्ल्यानंतर कमला हॅरिस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील क्लबबाहेर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. ट्रम्प सुरक्षित असल्याचे समजताच मला आनंद झाला. कारण अमेरिकेत हिंसेला स्थान नाही," असे त्यांनी म्हटले आहे.