पुढारी ऑनलाईन डेस्क : Bitcoin Price Hike : क्रिप्टोकरन्सीच्या जगात बिटकॉइनच्या किमतीने पुन्हा एकदा उच्चांकी आकडा गाठून नवा विक्रम आपल्या नावावर केला. ट्रेडिंग सत्रादरम्यान, बिटकॉइनची किंमत प्रथमच 97 हजार डॉलर्सपेक्षा जास्त दिसून आली. ट्रम्प यांच्या विजयानंतर बिटकॉइनच्या किमतीत जवळपास 29 हजार डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आता लवकरच बिटकॉइनची किंमत एक लाख डॉलरच्या पुढे जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे. गुरुवारी (दि. 21) बिटकॉइन 3.19 टक्के वाढीसह 97,394 डॉलरच्या पातळीवर व्यवहार करताना दिसून आले.
जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमती नव्या स्तरावर पोहोचल्या आहेत. कॉइन डेस्क डेटानुसार, ट्रेडिंग सत्रादरम्यान बिटकॉइन 97,394 डॉलरच्या विक्रमी पातळीवर दिसून आले. गेल्या एका आठवड्यात बिटकॉइनच्या किमती सुमारे 2 टक्क्यांनी वाढल्या होत्या. एका महिन्यात बिटकॉइनने गुंतवणूकदारांना 33 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. बिटकॉइनच्या किमती 3 महिन्यांत 56 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. तर बिटकॉइनने एका वर्षात गुंतवणूकदारांना 146 टक्के परतावा दिला आहे. सध्या बिटकॉइनचे मार्केट कॅप 1.82 ट्रिलियन डॉलरच्या पुढे पोहोचले आहे.