जेम्स वेब टेलिस्कोप उलगडणार ब्रह्मांडाची रहस्ये | पुढारी

जेम्स वेब टेलिस्कोप उलगडणार ब्रह्मांडाची रहस्ये

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : नासाचा ‘जेम्स वेब’ स्पेस टेलिस्कोप (अंतराळ दुर्बीण) शनिवारी एरियन रॉकेटच्या माध्यमातून फ्रेंच गुयानातील तळावरून अंतराळात झेपावला. जगातील हा सर्वाधिक क्षमतेचा स्पेस टेलिस्कोप आहे.

नासा, युरोपियन आणि कॅनेडियन अंतराळ संस्थांनी तब्बल 75 हजार कोटी रुपये खर्च करून ही शक्तिशाली दुर्बीण तयार केली आहे. पृथ्वीवर उडत असलेल्या चिमणीचाही वेध हा टेलिस्कोप थेट अंतराळातून घेऊ शकतो. हा टेलिस्कोप पृथ्वीव्यतिरिक्त ब्रह्मांडातील एखाद्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे काय, एलियनचे अस्तित्व खरोखरच आहे काय, याचाही शोध घेणार आहे.

अंतराळात 1990 मध्ये पाठवलेल्या ‘हबल’ टेलिस्कोपच्या तुलनेत ही दुर्बीण 100 पट प्रभावी आहे. ‘जेम्स वेब’ टेलिस्कोप पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर स्थापित केला जाईल. तार्‍यांची निर्मिती आणि आकाशगंगांमध्ये होत असलेल्या बदलांचीही त्याद्वारे माहिती मिळेल. ही दुर्बीण 13.5 अब्ज वर्षांपूर्वी घडलेल्या अवकाशीय घटनांवर नवा प्रकाश टाकेल. ब्रह्मांडाच्या अगदी सुरुवातीच्या काळात तयार झालेल्या आकाशगंगा, उल्कापिंडे आणि ग्रहांचाही शोध घेणे शक्य होणार आहे. या टेलिस्कोपमुळे अंतराळातील अनेक रहस्ये उलगडतील, कदाचित एलियन अस्तित्त्वात आहेत का, याचाही थांगपत्ता लागू शकेल.

‘जेम्स वेब’ टेलिस्कोपच्या ‘ऑप्टिक्स’वर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या तापमानाचे व्यवस्थापन होईल. अतिउच्च तापमानापासून कॅमेर्‍यांच्या बचावासाठी टेनिस कोर्टच्या आकाराची पाच थर असलेली ‘सनशील्ड’ बसवण्यात आली आहे. नासाचे द्वितीय प्रमुख जेम्स वेब यांचे नाव दिलेल्या या दुर्बिणीचा व्यास 21 मीटर आहे. हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठा अंतराळ विज्ञान प्रकल्प मानला जातो.

Back to top button