रियाध; वृत्तसंस्था : सौदी अरेबियाच्या मक्का या मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या शहराचे तापमान हज यात्रेवेळी 52 अंश सेल्सिअसवर गेल्याने 12 जूनपासून ते आजअखेर 577 यात्रेकरू उष्माघाताने मरण पावले आहेत. 14 जूनपासून सुरू झालेल्या या यात्रेचा बकरी ईदला समारोप झाला. बुधवारी यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली. दरम्यान भारत सरकार सौदी अरेबिया सरकारशी संपर्कात असून यात कोणी भारतीय यात्रेकरू आहे काय याची माहिती घेतली जात आहे.
यंदा 18 लाख लोक हजला आलेले होते. यापैकी 16 लाख हे अन्य देशांतून आलेले होते. शेकडो रुग्ण अद्यापही विविध रुग्णालयांत दाखल असल्याने त्यांचा सौदीतील मुक्काम लांबलेला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक 323 नागरिक इजिप्तचे आहेत. यातील अनेकजण नोंदणीशिवाय आलेले असल्याचे सौदी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मृतांमध्ये जॉर्डनचे 60 जण आहेत. इराण, इंडोनेशियासह अन्य देशांतील यात्रेकरूही मृतांमध्ये आहेत. उष्णतेचा फटका तीन हजारांवर यात्रेकरूंना बसला. अद्यापही 2 हजार यात्रेकरूंवर विविध रुग्णालयांतून उपचार सुरू आहेत. शवागार मृतदेहांनी भरून गेलेले आहेत.
सोमवारी मक्केतील मशिदीमधील तापमान 51.8 अंश सेल्सिअस होते. गर्दीही प्रचंड होती. अराफात पर्वतावरील विधीसह बहुतेक हज विधी दिवसा पार पडतात. यात्रेकरूंना बराच वेळ उन्हात राहावे लागते. त्यात हवामान बदलामुळे मक्केतील तापमान दरवर्षी वाढतच चाललेले आहे. सौदी प्रशासनाने यात्रेकरूंना सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. बहुतांश यात्रेकरूंनी छत्रीचा वापर केला. सूचनाही पाळल्या; पण ऊन इतके प्रखर होते की, जीवितहानी झालीच.
हज यात्रेसाठी सौदीकडून सर्वाधिक कोटा इंडोनेशियाला दिला जातो. यानंतर पाकिस्तान, भारत, बांगला देश आणि नायजेरिया या देशांचा क्रमांक आहे.